भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना, प्रेक्षकांना मैदानात केवळ पैसे, मोबाईल आणि चावी नेण्याचीच परवानगी

भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी पहिला टी 20 सामना गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना (IND vs SRI first T20 match) बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना सोबत फक्त पैसे, मोबाईल आणि गाडीची चावी घेऊन जाण्याची परवानगी असणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:26 PM, 4 Jan 2020
भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना, प्रेक्षकांना मैदानात केवळ पैसे, मोबाईल आणि चावी नेण्याचीच परवानगी

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी टी 20 मालिकेतील पहिला सामना आसामच्या गुवाहटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना (IND vs SRI first T20 match) पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना पैसे, मोबाईल आणि गाडीची चावी वगळता इतर वस्तू सोबत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रेक्षकांना आपल्यासोबत कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा बॅनर स्टेडियमध्ये (IND vs SRI first T20 match) घेऊन जाता येणार नाहीत. याशिवाय प्लेकार्ड्सही चालणार नाहीत. इतकेच काय तर साधा ‘मार्कर’ देखील घेऊन जाता येणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून आसाममधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये रान पेटलं आहे. या कायद्याच्या विरोधात आसाममध्ये अनेक आंदोलनं ककरण्यात आली. आंदोलनकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली गेली. CAA कायद्याच्या विरोधातील पहिली ठिणगी याच राज्यातून पडली. या सर्व घडामोडी घडत असतानाच रविवारी आसामच्या गुवाहाटी येथे नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.

आसाममधील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी बघता या सामन्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा सामना बघायला येणाऱ्या क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा प्लेकार्ड घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. आंदोलक पोस्टर किंवा बॅनर घेऊन स्टेडियममध्ये निदर्शने देऊ शकतात या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुवाहाटी येथे 2017 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 सामना खेळला गेला होता. या सामन्यानंतर काही माथेफिरुंनी ऑस्ट्रेलियाच्या टिमच्या बसवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत बसच्या खिडकीचा काच तुटला होता. आसाम क्रिकेट असोशिएशनचे सचिव देवजीत सैकिया यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याच घटनेचा संदर्भ दिला.

‘गुवाहाटी येथे रविवारी भारत आणि श्रीलंकामध्ये होणारा क्रिकेट सामना हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे फक्त आसामचेच नाही तर इतरही लोक चिंतेत आहेत’, असं देवजित सैकिया म्हणाले आहेत. सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये ‘मार्कर’ घेऊन जाण्यासही बंदी असणार आहे. त्याचबरोबर पुरुषांना त्यांचे पाकिट, महिलांना त्यांची हँडबॅग, मोबाईल आणि वाहनाची चावी घेऊन जाण्याची अनुमती राहणार आहे.

टी 20 सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंची यादी :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन