भारतीय अभिनेत्री थांबलेल्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने बचावली!

भारतीय अभिनेत्री थांबलेल्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने बचावली!

कोलंबो (श्रीलंका) : कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री सुदैवाने थोडक्यात बचावली. राधिका शरद कुमार असे या अभिनेत्रीचे नाव आहे. राधिका शरद कुमार या तामिळ चित्रपटसृष्टीत काम करतात.

राधिका कुमार या श्रीलंकेत फिरण्यासाठी गेल्या होत्या आणि कोलंबोच्या ज्या हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या, तिथे बॉम्बस्फोट झाला. मात्र बॉम्बस्फोट होण्याआधी राधिका यांनी हॉटेल सोडले होते. त्यामुळे सुदैवाने राधिका थोडक्यात बचावल्या.

या घटनेवर अभिनेत्रीने ट्विटर अकांऊंटवरुन म्हटलं, “हे देवा, श्रीलंकेत बॉम्बस्फोट, देवा आम्हाला साथ दे, मी आताच कोलंबो सिनमन ग्रँड हॉटेलमधून बाहेर आली आणि त्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला. विश्वास बसत नाहीय.”

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये काल (21 एप्रिल) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली. आठ साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण श्रीलंका हादरली. इस्टर संडेच्या दिवशी चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली. या हल्ल्यात 3 चर्च आणि 4 फाईव्हस्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 450 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. मृतांमध्ये चार भारतीयांचाही समावेश आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबद्दल संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.


श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर

श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेल्या किंवा तिथे राहत असलेल्या भारतीयांना मदत हवी असल्यास, श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. +94777903082, +94112422788, +94112422789 या नंबरवर श्रीलंकेतील भारतीय नागरिक संपर्क करु शकतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI