भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान बेपत्ता

भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान बेपत्ता

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे AN-32 हे विमान आसामच्या जोरहाटवरुन उड्डाण केल्यानंतर अचानक बेपत्ता झालं आहे. या विमानामध्ये पाच प्रवासी आणि आठ कर्मचारी असे एकूण 13 जण आहेत. भारतीय हवाई दलाकडून सध्या या विमानाचा शोध घेतला जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलाचे AN-32 बनावटीचे विमानाने आज दुपारी 12.25 वाजता आसामच्या जोरहाटवरुन उड्डाण केलं. यानंतर अरुणाचल प्रदेशामधील मेंचुका एअर फील्डवरुन हे विमान बेपत्ता झाले. या विमानाशी दुपारी 1 वाजता शेवटचा संपर्क झाला. मात्र त्यानंतर अजूनही या विमानाशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे हवाई दलाकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाकडून विमानाचा कसून शोध सुरु केला आहे. या विमानाच्या शोध मोहीमेसाठी भारतीय हवाई दलाकडून सुखोई-30 आणि सी-130 ही लढाऊ दोन विमान रवाना करण्यात आली आहेत.

अरुणाचल प्रदेशामधील मेंचुका एअर फील्डवरुन ही चीन देशाच्या सीमारेषेजवळ आहे. याआधी जुलै 2016 मध्ये अशाचप्रकारे हवाई दलाचे AN-32 बनावटीचे एक विमान बंगालच्या खाडीजवळ बेपत्ता झाले होते. या विमानात 29 प्रवाशी होते. या विमानाने चेन्नईमधून उड्डाण केले होते. हे विमान अंदमान निकोबार बेटाजवळ जात असताना अचानक या विमानाचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले. भारतीय हवाई दलाकडून विमानाची शोधमोहीम सुरु करण्यात आली. मात्र या शोधमोहीमेत या विमानाचा कोणताही शोध लागला नाही. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये हवाई दलाने शोध मोहिम थांबवली आणि विमानातील सर्व 29 प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI