भारतीय वायूदलाची ताकद वाढली, चिनूक हेलिकॉप्टर चुणूक दाखवणार!

भारतीय वायूदलाची ताकद वाढली, चिनूक हेलिकॉप्टर चुणूक दाखवणार!


नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात आज ‘चिनूक’ हेलिकॉप्टर सामील झाले. अमेरिकी कंपनी बोईंगने बनवलेली ही 4 चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टर चंदीगडमधील हवाई दलाच्या विमानतळावर दाखल झाली आहेत. अशी एकूण 15 हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत.

चिनूक हे हेव्हीलिफ्ट हेलिकॉप्टर असून अगदी उंच ठिकाणांवरही मालवाहतूक व सैनिकांच्या दळणवळणासाठी याचा वापर होणार आहे. भारताने 2015-16 मध्ये मागवलेल्या 2 हेलिकॉप्टरपैकी चिनूक हे एक आहे. दुसरे हेलीकॉप्टर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘अपाचे’ हे आहे. अपाचे देखील यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत भारतीय हवाई दलात दाखल होईल. यात एकीकृत ‘डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टम’ आहे. तसेच ‘कॉमन एविएशन आर्किटेक्चर कॉकपिट’ आणि ‘अॅडवांस्ड कॉकपिट’ सारख्या विशेष सुविधा आहेत. या हेलिकॉप्टरमधून एकाचवेळी दारुगोळा, हत्यारे यांच्यासह सैनिकांनाही नेता येणार आहे. चिनूक हेलिकॉप्टरला रडारद्वारे पकडणेही अवघड आहे.

चिनूक जड हत्यारे, तोफांची वाहतूक करण्यास सक्षम असून 20 हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर उडू शकते. जवळजवळ 10 टनांपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर प्रतितास 280 किमीच्या वेगाने उडू शकते. याची ऊंची 18 फूट, तर रुंदी 16 फूट आहे. या हेलिकॉप्टरला 2 पायलट चालवू शकतात. जगभरातील 26 देशांमध्ये याचा उपयोग केला जातो. आता भारताचाही या देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

चंडीगडमधील भारतीय वायूदलाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या हस्ते औपचारिकपणे चिनूक हेलिकॉप्टरला वायूदलात दाखल करण्यात आले. यावेळी बोलताना एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ म्हणाले, “चिनूक हेलिकॉप्टर वायूदलाच्या अनेक मोहिमा पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल. फक्त दिवसाच नाही, तर रात्रीही याचा उपयोग होऊ शकतो”.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI