पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती

दरवर्षी जून महिन्यात धो-धो बरसणारा पाऊस जुलैचा अर्धा महिना संपला तरी अद्याप गायबच आहे. त्यामुळे नांदेडची वाटचाल दुष्काळाकडे होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती

नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून वरुणराजाने अवकृपा दाखवली आहे. त्यामुळे नांदेडमधील गेल्या तीन वर्षापासून अनेक गावात दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाही पावसाअभावी नांदेडमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय. नांदेड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 960 मिलिमीटर इतकी आहे, मात्र यंदा जिल्ह्यात 14 जुलै पर्यंत सरासरीच्या केवळ 12 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे  70 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत.

आज न उद्या पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊसच नसल्याने जमिनीत ओल मुरलेली नाही. त्यामुळे अनेकांची हळद लागवड वाया गेली. त्यातच पावसाअभावी केळी आणि उसाचे नगदी पीक वाळून जात आहेत. त्यातच अद्याप पाऊस न झाल्याने नांदेडमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरवर्षी जून महिन्यात धो-धो बरसणारा पाऊस जुलैचा अर्धा महिना संपला तरी अद्याप गायबच आहे. त्यामुळे नांदेडची वाटचाल दुष्काळाकडे होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पाऊस न झाल्याने नांदेडमध्ये पाणी टंचाई देखील अद्याप कायमच आहे. जिल्ह्यात सध्या 156 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गोदावरी काठावर असलेल्या नांदेड शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यापूर्वी इतकी भीषण पाणी टंचाई नांदेडमध्ये कधीच उद्भवली. पाऊसच नसल्याने सगळे ओढे-नाले आणि नद्याही कोरड्याठाक आहेत. जिल्ह्यातील सगळ्याच जलप्रकल्पाने तळ गाठलाय. गुरांच्या हिरव्या चाऱ्याचीही भीषण टंचाई जिल्ह्यात निर्माण झाली. त्याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे.

जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याचा काहीसा अपवाद वगळता मराठवाड्यातील बहुतांश भागात असचं चित्र आहे. त्यामुळे भाजीपाला प्रचंड महागला. आता पाऊस आला तरी खरीप हंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यातच अन्न-धान्याची महागाई भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकूण पाऊस लांबल्याने मराठवाड्यातल्या चिंता वाढल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI