पुण्यात बहीण-भावाचा सावत्र आईकडून अमानुष छळ

पुण्यात बहीण-भावाचा सावत्र आईकडून अमानुष छळ

पिंपरी चिंचवड : सावत्र आईकडून होणारा छळ तुम्ही सिनेमात पाहिला असेल. पण यापेक्षाही अमानुष छळ पिंपरी चिंचवडमध्ये झाला आहे. कामातला ‘क’ देखील माहिती नसलेल्या दोन लहानग्यांकडून सावत्र आई घरातील सर्व कामे करून घेत होती. काम न केल्यास कधी काठीने मारहाण, तर कधी गरम लोखंडी सळईने चटके देण्यात आले.

यापेक्षा भयंकर म्हणजे त्या दोन निरागस जिवांना उपाशीही ठेवण्यात आलं. बाल वयात या नरकयातना सहन न झाल्याने ते लहान बहीण-भाऊ गावाला पळून चालले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ते पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या यातना ऐकून आणि अंगावरील जखमा पाहून पोलिसांनाही आपले अश्रू आवरता आले नाही. पोलिसांनी पुढाकार घेत सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

घरातली सर्व कामं दोन बहीण-भावांकडून सावत्र आई करून घेत असे. कामांमध्ये काही चुका झाल्यास किंवा कामाला उशिर झाल्यास त्यांना काठीने मारहाण केली जात होती. कधी-कधी गरम सळईचे चटकेही दिले जात होते. काम न केल्यास त्यांना वेळोवेळी उपाशीही ठेवण्यात येत होतं. सावत्र आईच्या या कृतीला वडिलांचीही साथ होती.

दररोज होणारा हा त्रास सहन न झाल्याने त्या दोघांनी लातूर येथील गावाला आपल्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोशीपासून ते चालत भोसरीपर्यंत आले. तेथून लातूर येथे जाण्यासाठी कोणते वाहन मिळेल ,याबाबत नागरिकांकडे चौकशी करत होते. ही बाब एका नागरिकाने पोलिसांना सांगितली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या दोघांना ताब्यात घेतलं.

या निरागस मुलांच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांनाही आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी त्या दोन्ही मुलांना घेऊन वायसीएम रुग्णालय गाठलं. तिथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच अमानुष मारहाण करणाऱ्या सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI