व्हिडीओ : पुण्यात प्रसिद्ध एसपीजी हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या

व्हिडीओ : पुण्यात प्रसिद्ध एसपीजी हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या


पुणे : पुण्यातील प्रसिद्ध एसपीजी (SPG) हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज 2 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ग्राहकाने हॉटेल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असता, हॉटेल कर्मचाऱ्यांनी उलट ग्राहकालाच दमदाटी केली. दरम्यान या घटनेबाबत पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील टिळकरोड परिसरात एसपीजी नावाचे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील बिर्याणी फार प्रसिद्ध आहे. पुणेकर मोठ्या चवीने या ठिकाणची बिर्याणी खातात. आज दुपारच्या सुमारास एका ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी खात असताना अचानक त्या ग्राहकाच्या जेवणात अळी आढळून आली. बिर्याणीत अळी पाहताच ग्राहकाला धक्का बसला.

त्यानंतर ग्राहकाने याबाबत वेटरकडे विचारणा केली. मात्र तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप त्या ग्राहकाने केला आहे.

या ग्राहकाने आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल आहे. त्यामुळे आम्ही त्या ग्राहकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. अशी एसपीज हॉटेलचे मॅनेजर बाळसाहेब वाकरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

याआधी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता पुण्यातील एसपीजी हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या सापडल्या आहेत. या दोन्ही धक्कादायक घटनांमुळे पुणेकरांच्या जीवाशी सर्रास खेळ सुरु असल्याचं समोर येत आहे. तसेच याप्रकरणी पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) द्वारे कोणतीही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही संतप्त नागरिकांनी विचारला आहे.