आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यांचा आनंद लुटतोय : कंगना रणावत

आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यांचा आनंद लुटतोय : कंगना रणावत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये अनेक सेलिब्रिटींनी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन या सेलिब्रिटींनी केलं. तर अभिनेत्री कंगना रणावतने आपण सध्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जगत असल्याचं म्हटलंय.

“हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पाच वर्षांमध्ये एकदाच हा दिवस येतो. माझं आवाहन आहे की सर्वांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा. मला असं वाटतं की माझा देश आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद घेतोय. कारण यापूर्वी आपण सर्व मुघल, ब्रिटीश आणि इटालियन सरकारचे गुलाम होतो. यापूर्वीच्या पक्षांनी लंडनमध्ये सुट्ट्या साजऱ्या केल्या आणि आनंद लुटला”, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.

कंगना नेहमीच तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. काँग्रेस सरकारवर तिने टीका केली. “काँग्रेस सरकारच्या काळात परिस्थिती वाईट होती. बलात्कार, गरीबी, प्रदूषण यांची आज जी परिस्थिती आहे, या तुलनेत काँग्रेसच्या काळात आणखी वाईट परिस्थिती होती. ही स्वराज्य आणि स्वधर्माची वेळ आहे. आपण मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवं,” असं आवाहन कंगनाने केलं.

कंगनाने यापूर्वीही मोदींचं कौतुक केलं होतं. तिच्या विविध वक्तव्यांमुळे ती कायम चर्चेत असते. बॉलिवूड असो किंवा राजकारण, ती मनाला न पटलेल्या गोष्टी थेट बोलते. बॉलिवूडमधील अनेकांवरही तिने जाहीरपणे टीका केलेली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावरही तिने टीका केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI