पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचं ‘लिव्ह इन रिलेशन’

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचं 'लिव्ह इन रिलेशन'

पुणे : 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात तरुणाई साजरा करते. ऐन तारुण्यात प्रेमानं आयुष्य फुलासारखं रंगबेरंगी बनतं आणि उतारवयात जगण्याचा मार्ग. फक्त आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र सकारात्मक हवा. पुण्यातील काही ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाचा हा मार्ग सापडलाय. लाईफ पार्टनरच्या अकाली मृत्यूनतर त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात केलीय. तीही काहीसा आधुनिक टच असलेल्या ‘लिव्ह इन रिलेशन’ने. एकाकी जीवन जगण्यापेक्षा आधाराने जगणं कधीही चांगलं, हेच या ज्येष्ठ नागरिकांन हेरलं आहे.

लिव्ह इन रिलेशन… असं नुसतं ऐकलं, तरी सुरुवातीला कान टवकारतात, डोळे विस्फारतात, कुजबूज सुरु होते. हे काय पाश्चिमात्य जगणं, असं म्हणत अनेकजण झिडकारतातही. मात्र, नात्यांची गुंफण जर या पद्धतीने नीट बांधता येत, असेल तर कसलं आलंय त्यात पाश्चिमात्यपण!

उतारवयात भयंकर एकाकीपणा, हातून वेगाने निसटणारं वय आणि वेगवेगळे आजार… एक ना अनेक समस्या माणसाला भेडसावतात. त्यामुळे काठीच्या आधारासोबतच मानसिक आधारही महत्वाचा आसतो. ज्येष्ठ नागरिकांची हीच गरज ओळखून पुण्यात 2012 साली ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना झाली. आतापर्यंत 35 जण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. तर अनेकजण इच्छुक आहेत. लिव्ह इन रिलेशनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ज्येष्ठांना उतारवयाची ‘आधाराची काठी’ मिळाली.

अनिल यार्दी-आसावरी कुलकर्णी यांचं लिव्ह इन रिलेशन

अनिल यार्दी आणि असावरी कुलकर्णी हे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. गेल्या चार वर्षांपासून दोघंही आनंदानं एकत्र आहेत. 2013 साली पत्नीचं निधन झाल्यानं अनिल व्यथित होते. दिवस कामात जायचा. मात्र घरी आल्यावर घर खायला उठायचं. अनेकांनी लग्न करायचा सल्लाही दिला. मात्र, बंधनात अडकण्याची इच्छा नव्हती. माग ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळाच्या माध्यमातून दोघांचं सूत जुळलं. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. काही काळाने हा विरोधही मावळला. लिव्ह इन रिलेशनमध्ये दोघांचं सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे लग्न करुन आता काय करणार, असा सवाल ते करतात.

अनिल आणि असावरी कुलकर्णी यांनी पूर्ण विचार करुन लिव्ह इन रिलेशनचा निर्णय घेतला आहे. 1997 साली पतीच्या निधनानंतर असावरी यांना एकटेपणा सतावत होता. त्यातच 2012 साली नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांना सहकार्याची गरज वाटू लागली. त्यातच  लिव्ह इन रिलेशन मंडळाच्या सहलीत असावरी आणि यार्दी यांची ओळख पडली. पहिल्या भेटीतच दोघांनी मैत्रीचा निर्णय घेतला.  दहा महिने ते एकमेकांना भेटत राहिले. आखेर मनं जुळल्यानं दोघांनी लिव्ह इन रिलेशनचा निर्णय घेतला. मुलानं आणि भावानंही संमती दिली आसून गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.  पैशाचा हिशोब महिन्याला वाटून घेतात.

आधी लिव्ह इन रिलेशन आणि नंतर लगीनगाठ

लिव्ह इन रिलेशन मंडळाचे काही सदस्य विवाहबद्धही झालेत. अरुण देव आणि  मीना लांबी यांनी रेशीमगाठीचं पवित्र बंधन स्वीकारलं आहे. अरुण देव हे कॅनेरा बॅकेतून 2001 साली निवृत्त झाले आणि 2009 साली पत्नीचं निधन झालं. यानंतर ते जेष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशन मंडळाच्या संपर्कात आले. मनं जुळल्यानं  दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलांनी लग्नाला विरोध केला माञ डिसेंबर 2013 लग्न केलंय. लग्ना नंतर पाच वर्षे एकत्र राहतायत

मीना लांबे यांच्या पतीचं तीस वर्षापूर्वी निधन झालं होतं. मात्र मुलगा आणि मुलीच्या संगोपनात त्या रमल्या. मुलं संसारात रमल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लिव्ह इन रिलेशन मंडळाच्या माध्यमातून देव यांच्या संपर्कात आल्या. विचार जुळल्यानं दोघंही विवाहबद्ध झाले. या वयात शेअरिंगची गरज आसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लिव्ह इन रिलेशनवर अनेकांची मतमतांतरे आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये ‘लव्ह’ सापडलं आहे आणि तेच त्यांचं हृदय धडकत राहण्याचं रहस्य आहे.

Published On - 8:06 am, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI