महाबळेश्वरचा पारा शून्य अंशावर, राज्यात थंडीसह पावसाची शक्यता

महाबळेश्वरचा पारा शून्य अंशावर, राज्यात थंडीसह पावसाची शक्यता

सातारा : राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे पारा थेट शून्य अंशावर घसरला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा कमी झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे महाबळेश्वरच्या थंडीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र थंडी वाढलेली असून महाबेळश्वर येथे बर्फ पडत आहे. या थंडीचा परिणाम तेथील स्ट्रॉबेरीच्या पिकावरही झाला आहे. या आठवड्यात थंडी गायब झालेली दिसून आली. मात्र बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारे बंद झाल्याने राज्याच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेतट घट झाली आहे. महाबळेश्वर येथे नीचांकी 6.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे तेथील पाणीही गोठलं आहे.

महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, धुळे, रत्नागरी, सातारा इतर भागातही थंडीत वाढ झाली आहे. तर मराठवाडा, विदर्भात काही प्रमाणात थंडी आहे. पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार  सुरु राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) 17.6, सांताक्रुझ 14.4, पुणे 10.2, अहमदनगर 9.6, अलिबाग 15.5, रत्नागिरी 18.3, कोल्हापूर 16.5, औरंगाबाद 10.0, उस्मानाबाद 10.4, परभणी 14.8, नांदेड 18.0, सातारा 12.9, सांगली 14.0, सोलापूर 16.6, जळगाव 12.4, नाशिक 9.8, नागपूर 14.8, वर्धा 16.0, यवतमाळ 15.4 बीड 14.8, अकोला 13.5, अमरावती 15.0, बुलडाणा 12.0, ब्रम्हपुरी 17.7, चंद्रपूर 17.6, गोंदिया 14.5, वाशिम 14.0

राज्यात थंडीचा कहर

नाशिक

राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद नाशिकमधील निफाड येथे करण्यात आली आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून निफाड तालुक्याचाही पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा, शिवडी, उगांव, पिंपळगांव, मांजरगाव परिसरात  सकाळी पारा थेट 0 अंशावर पोहचला, तर  कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी येथील हवामान केंद्रावर 3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे शेतातील पिकांवर तसेच वाहनांवर बर्फाची चादर  तयार झाली आहे. काडाक्याचा थंडीमुळे परिपक्व द्राक्षमाल तडकुन मोठे नुकसान होण्याचा धोका  निर्माण झाला आहे.

मुंबई

शुक्रवारी संध्याकाळपासून मुंबईकर गारठले आहेत. अचानक आलेल्या या थंड लाटेमुळं मुंबईकर हुडहुडत आहे. तापमानात तब्बल 6.6 अंशांची घसरण झाली आहे. वरळी सी फेसवर चक्क शेकोटी पेटवून हात पाय शेकत आहेत. गेल्या दहा वर्षात मुंबईमध्येही तापमानात घट झाली आहे. 12 अंश सेल्सिअस तापमानांची नोंद मुंबईत झाली आहे.

पुणे

पुण्यातही थंडीचा कडाका वाढल्यामुळे तेथील तापमानात घट झाली आहे. पुणे येथे 10.2 अंशावर पारा घटला आहे यामुळे सर्वत्र वातावरण थंड आहे. पुणेकरही या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे, तर काहीजण खंडाळा आणि लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा आनंद लुटण्यासाठी जात आहेत.

रायगड

रायगडमध्येही गेल्या 20 वर्षातील भीषण थंडी पडली आहे. मागील दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यातही कडाक्याच्या थंडीची शीतलहर चालू आहे. रायगड जिल्ह्यात असलेल्या माथेरानमध्ये थंड हवेच्या ठिकाणी पारा 9 ℃ पर्यंत गेला आहे, तर उर्वरीत रायगडमध्ये 12-13 ℃ इतका पारा खाली आला आहे.

रत्नागिरी

गेल्या चार दिवसांपासून कोकणाला सुद्धा हुडहुडी भरली आहे. रत्नागिरीचे तापमान सुद्धा 12 अंशापर्यत खाली आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी आणि धुकं कोकणात कधीच पहायला मिळत नाही. मात्र यावर्षी थंडीमुळे कोकणात सकाळीच धुक्याची चादर पहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात रत्नागिरीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. दिवसभर बोचरी थंडी आणि वाऱ्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच हैराण झाले आहेत.

नंदुरबार

नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा एकदा घट झालेली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात पारा 5 अंशवर आला आहे, तर नंदुरबार शहरात 11 अंश इतके नोंदविण्यात आले आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात करण्यात आली आहे  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शीत लहरींचा प्रभाव जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम जन जीवनावर झाला आहे. दिवसा ही गारठा जाणवत आहे रात्री नागरिकांना थंडीपासून वाचण्यासाठी शकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI