रत्नागिरीचा आढावा | शिवसेना बालेकिल्ला राखणार का?

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर २०१४ मध्ये सेनेनी भगवा फडकवला.

रत्नागिरीचा आढावा | शिवसेना बालेकिल्ला राखणार का?
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 4:33 PM

रत्नागिरी : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची नाळ नेहमी कोकणाशी जुळलेली. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर २०१४ मध्ये सेनेनी भगवा फडकवला. तर दोन जागांवर राष्ट्रवादीनं सेनेला धक्का दिला. पण पाच वर्षानंतर आता सेनेनी इथं आपली पक्कड मजबूत केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत घरवापसी केलीय. तर भाजपने गुहागर आणि रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर दावा ठोकलाय. सेना आणि भाजपच्या युतीवर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील गणितं अवलंबून राहणार आहेत. तर राणेंच्या स्वाभिमान भाजपमध्ये विलिन झाल्यास, राणे सेनेला टक्कर देण्यास बालेकिल्यात यशस्वी होईल का याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागून राहिलीय.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ- (Ratnagiri Vidhansabha)

पारंपारिक भाजपचा मतदार संघ..पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून सेनेत उडी मारून उदय सामंत यांनी या मतदार संघावर आपला दबदबा कायम राखला. 40 वर्षांनंतर सेनेला उदय सामंत यांच्या रुपात रत्नागिरीत पहिले `आमदार पद’ मिळाले.  २०१४ च्या निवडणुकीत उदय सामंत यांनी  38,856 मताधिक्क्यांनी इथून विजय मिळवला.

हायहोल्टेज मतदारसंघात सामंत यांनी एकतर्फी विजय मिळवला. २०१४ मध्ये सेना विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगली होती.२०१९ च्या निवडणुकीत मात्र रत्नागिरीत विधानसभा मतदार संघातून उदय सामंत चौथ्यांदा आपलं नशिब आजमावणार आहेत.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं युती झाली नाही तर इथली निवडणूक रंगतदार होईल. पण सामंत यांचा या मतदार संघावर कायमच दबदबा राहिलाय. माजी खासदार आणि स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणेंची या मतदार संघातील भूमिका येणाऱ्या निवडणुकीत रंगत आणू शकते.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ २०१४ निकाल

  • उदय सामंत, शिवसेना- ९३,८७६ विद्यमान आमदार
  • बाळासाहेब माने, भाजप- ५४,४४९
  • प्रचाराचे मुद्दे- दिशाहीन विकास, बेरोजगारी, पिण्याचा पाणी प्रश्न, बंदर विकास, पर्यटन

राजापूर विधानसभा मतदारसंघ – (Rajapur Vidhansabha)

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ. नाणार आँईल रिफायनरी प्रकल्प आणि जैतापूर अणू उर्जा प्रकल्पाच्या विरोधामुळे हा मतदारसंघ जगाच्या नजरेत आला.

हा मतदारसंघ म्हणजे सेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेचे आमदार राजन साळवी आता या मतदार संघातून हॅट्रिक साधण्याच्या विचारात आहेत. 2009 सालापासून त्यांनी या मतदारसंघात चांगलेच पाया रोवलेत.पण मूळ रत्नागिरीचे असल्याने यावेळी स्थानिक उमेदवारीच्या मागणीमुळे राजन साळवी यांच्यासमोर अडचण वाढू शकते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार आँईल रिफायनरी प्रकल्प रद्द करून सेनेनं या मतदारसंघात कंबर कसली आहे. तर दुसरीकडे हा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेसचा म्हणून देखील ओळखला जातो. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी थेट काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी काँग्रेस पक्षातून मुलाखत दिलीय. नाणार प्रकल्पाच्या समर्थनाचा मुद्दा पुन्हा गरम होतोय. तर राणेंची या मतदार संघातील खेळी सुद्धा निर्णायक ठरू शकते. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदार संघाकडे राजकीय विश्लेषकांचे विशेष लक्ष्य असणार हे नक्की.

राजापूर विधानसभा निवडणूक निकाल २०१४

  • राजन साळवी, शिवसेना- ७६,२६६ विद्यमान आमदार
  • राजन देसाई, काँग्रेस- ३७,२०४
  • निवडणुकीतले प्रमुख मुद्दे—- नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प, जैतापूर अणु उर्जा प्रकल्प रद्द करावा, धरणांची कामे अपुर्ण प्रश्न, धरणग्रस्तांचे पुर्नवसन

चिपळूण विधानसभा मतदारसंघ – (Chiplun Vidhan sabha)

रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी अशी चिपळूण विधानसभा मतदार संघाची ओळख. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हॅट्रिक साधण्याच्या विचारात आहेत. आजपर्यत या मतदार संघात कुणाला हॅट्रिक साधता आली नाही. त्यामुळे सदानंद चव्हाण यावेळी ही किमया करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागलंय.

भास्कर जाधव यांनी २००४ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर या  मतदारसंघात शिवसेनेची वाताहत झाली होती. मात्र सदानंद चव्हाण यांनी हा मतदारसंघ नव्याने बांधत २००९ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवला. त्यानंतर २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. पण सदानंद चव्हाण यांची डोकेदुखी वाढलीय ते  भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे.

भास्कर जाधव यांनी सेनेत घरवापसी केलीय. भास्कर जाधव यांनी आपल्या मुलाचा राजयोग कधी आहे हे माहित नसलं असं सांगितलं असले तरी त्यांचा चिरंजीव विक्रांत चिपळूण मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो. किंवा भास्कर जाधव सुद्धा चिपळूणातून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे सदानंद चव्हाण यांच्या भूमिकेकडे अनेकांच्या नजरा असणार.

गेल्या वेळी पराभूत झालेले राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी ही गेल्या पाच वर्षात चिपळूण विधानसभा मतदार संघात आपला चांगलाच दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. शांत संयमी आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या शेखर निकमांनी जोरदार तयारी सुरु केलीय. चिपळूण हे होमपीच असलेल्या भास्कर जाधवांची या मतदार संघातील भूमिका निर्णायक ठरू शकते. तर या मतदार संघात देवरूख आणि संगमेश्वरचा भाग येत असल्याने हा भागातून ज्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल त्याचीच सरशी होण्याची जास्त शक्यता आहे.

चिपळूण विधानसभा मतदार संघ निकाल-२०१४

  • सदानंद चव्हाण, शिवसेना ७५,६९५ विद्यमान आमदार
  • शेखर निकम, राष्ट्रवादी ६९,६२७
  • निवडणुकीचे प्रचाराचा मुद्दे— चिपळूण शहरातील पुरप्रश्न , तिवरे धरण फुटीनंतर पुर्नवसन प्रश्न, बेरोजगारी, वाशिष्ठी गाळ प्रश्न, अवैध वाळू उपसा

दापोली विधानसभा मतदारसंघ – (Dapoli Vidhansabha)

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कोकणातला ‘रात्रीस खेळ चाले’च्या राजकीय प्रयोगाला ज्या मतदार संघातून सुरु झाली तो हा मतदार संघ. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वाकसंघर्ष पेटलाय.

बंगाली बाबा घेऊन पर्यावरण मंत्री रामदास कदम फिरतात असा आरोप झाल्यानंतर खेड विधानसभा मतदार संघातील वातावरण पेटलंय. मात्र याच मतदार संघातून २०१४ मधल्या निवडणुकीचा इतिहास वेगळा सांगतो. तब्बल पाच टर्म आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी चार वर्षापूर्वीपासून या  मतदारसंघात काम सुरु केले.

दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड, दापोली आणि मंडणगड मतदारसंघ पिंजून काढतोय. पण तळागाळापर्यत पोहोचलेल्या संजय कदम यांचे सुद्धा पारडे जड मानले जातंय. या मतदारसंघात भाजपचं एक गठ्ठा मतदान आहे. त्यामुळे सेनेचा हा गड परत मिळवण्यासाठी मोठी राजकीय लढाईच खेळावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांची सुद्धा या मतदार संघातील ताकद कुणाच्या पारड्यात पडते यावर या मतदार संघातील निकाल अधीक सोपा होईल. पण या मतदार संघात सर्वात मारक ठरणारा फॅक्टरमध्ये कुणबी व्होट बँक.

दापोली-खेड मतदार संघात कुणबी समाजाने एकी दाखवत २०१४ मध्ये समाजाच्या उमेदवारांना एकगठ्ठा मते बहाल केली परिणामी शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांचे मताधिक्य घटून राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा विजय सुकर झाला होता.

दापोली विधानसभा मतदार संघ निकाल- २०१४

  • संजय कदम, राष्ट्रवादी ५२,९०७ विद्यमान आमदार
  • सूर्यकांत दळवी, शिवसेना ४९,१२३
  • प्रचाराचे मुद्दे- लोटे एमआयडीसी प्रदूषण प्रश्न, खेड शहर पुराचा प्रश्न, पर्यटन विकास, बेरोजगारी, बंदर विकास, मच्छिमारांसाठी मुलभूत सेवा सुविधा

गुहागर विधानसभा मतदार संघ – (Guhagar Vidhan sabha constituency)

पारंपारिक भाजपचा तसा संघाचामतदार संघ म्हणून याची ओळख आहे. गुहागर मतदारसंघात चिपळूण तालुक्याचा काही भाग येतो. पर्यटन दृष्ट्या संपन्न असा भाग. निसर्गाने गुहागरला भरभरून दिलंय. तसं राजकारण सुद्धा…नातू घराण्याची मक्तेदारी असलेला हा एकेकाळचा मतदार संघ. पण 2009 सालापासून या मतदारसंघाने महाराष्ट्राच्या राजकारणावर नाव नोंदवलं.

पर्यावरण मंत्री रामदास कदम, विनय नातू  आणि भास्कर जाधव  यांच्यात लढत झाली. त्यावेळी नातूसकट रामदास कदमांना या ठिकाणाहून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळेपासून भास्कर जाधव यांनी याच मतदार संघातून आपला दबदबा कायम ठेवला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अनेक मंत्रिपद याच मतदारसंघातील आमदारकीवर त्यांनी भूषवली. मात्र २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली. त्यामुळे गुहागर मतदार संघावर आता भास्कर जाधव दावेदारी सांगू शकतात. मात्र भाजपचे विनाय नातू यांनी पुन्हा या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितलाय. त्यामुळे युतीच्या वाटचालीवर या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. गुहागर मतदार संघातून सेनेचे अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशेवर भास्कर जाधव यांच्या सेनेतील घरवापसीने पाणी फेरलंय.

गुहागर मतदार संघ निकाल -२०१४

  • भास्कर जाधव राष्ट्रवादी ७२५२५ विजयी आमदार
  • डॉ. विनय नातू भाजप ३९७६१
  • विजय भोसले शिवसेना ३२०८३
  • प्रचाराचा मुद्दे— बेरोजगारी, पर्यटन विकास,बंदर विकास, मच्छिमारांसाठी मुलभुत सेवा सुविधा
Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.