ऐतिहासिक! कोर्टासमोर, न्यायाधीशांच्या परवानगीने व्हिडीओ कॉलने घटस्फोट

ऐतिहासिक! कोर्टासमोर, न्यायाधीशांच्या परवानगीने व्हिडीओ कॉलने घटस्फोट

नागपूर: मोबाईलवरुन तिहेरी तलाक दिल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र थेट कोर्टात न्यायाधीशांसमोर पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन, व्हिडीओ कॉलद्वारे घटस्फोट देण्यात आला आहे. नागपुरात ही घटना घडली. पत्नी अमेरिकेत, पती नागपुरात आणि व्हिडीओ कॉलद्वारे घटस्फोट न्यायालयात,  असं काहीसं नागपुरात घडलं. नवरा-बायकोच्या संमतीने कोर्टाने घटस्फोटाला मान्यता दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नागपुरात राहणार युवक आणि आंध्र प्रदेशातील युवतीचं अरेंज मॅरेज झालं. दोघेही अमेरिकेत वास्तव्यास होते. मात्र दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. काही कालावधीनंतर युवक नागपुरात आला, मात्र पत्नी अमेरिकेतील मिशीगनमध्येच राहिली. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल झालं. मात्र ही युवती अमेरिकेवरुन नागपूरला येणे शक्य नव्हतं. कारण तिचा स्टुडंट व्हिजा होता आणि ती इथे आली असती तर तिचा व्हिजा संपुष्टात येणार होता. मात्र दोघांनाही घटस्फोट घ्यायचा होता. न्यायालयात केस दाखल झाली आणि परिस्थिती न्यायालय समोर ठेवण्यात आली.

अमेरिकेत असलेली पत्नी घटस्फोटासाठी तयार असल्याने, दोघांच्या नावाने घटस्फोटासाठी संमतीपत्र तयार करण्यात आलं. पतीने त्यासाठी आवश्यक न्यायालयीन कागदपत्रे नागपुरातच तयार केली, तर पत्नीने तिची कागदपत्रं मिशीगनमधून तयार करुन पाठवली. अखेरच्या टप्प्यात न्यायालयाला मिशीगनमधून आलेली कागदपत्रं पत्नीच्या संमतीने तयार झाली.  त्यानंतर न्यायालयाला पत्नीची या घटस्फोटाला पूर्ण संमती आहे, हे स्वतः तपासायचं होतं. त्यासाठी पत्नीची कौटुंबीक न्यायालयात उपस्थिती आवश्यक होती. मात्र अमेरिकेतील प्रवासी कायद्यानुसार पत्नी भारतात आली, तर तिला पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळणं कठीण जाईल, ही बाब पत्नीच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पत्नीची संमती वकिलांनी व्हिडीओ कॉलने जाणून घेतली आणि न्यायालयासमोर ठेवली. न्यायालयाने ते ग्राह्य धरत घटस्फोटाला मंजुरी दिली.

पत्नीने यासंदर्भात स्वतःच्या पक्षाने आपल्या भावाला उपस्थित केलं होतं. तर पती मात्र प्रत्यक्षात उपस्थित होता. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी त्यांच्या उपस्थितीत व्हॉट्सअपवरुन व्हिडिओ कॉल करून युवतीची संमती नोंदवली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI