शार्प शूटर ते भिकारी, पोलिसाची वेदनादायी कहाणी, 1999 च्या बॅचच्या अधिकाऱ्याचा थरारक प्रवास

मनीष मिश्रा हे सध्या ग्वाल्हेरमधील स्वर्ग सदन आश्रमात आहेत. त्यांना भेटण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची रांग लागली आहे. ही रांग चौकशीसाठीच आहे, पण ही चौकशी गुन्ह्याच्या तपासाची नाही तर आपुलकीची आहे.

शार्प शूटर ते भिकारी, पोलिसाची वेदनादायी कहाणी, 1999 च्या बॅचच्या अधिकाऱ्याचा थरारक प्रवास


भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जवळपास दहा वर्षापासून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांची कहाणीही थरारक आहे. भिकाऱ्याकडे मोठी संपत्ती सापडल्याच्या अनेक बातम्या, अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत. मात्र मध्य प्रदेशातील या भिकाऱ्याची कहाणी वेदनादायी आणि थक्क करणारी आहे. मनीष मिश्रा (Gwalior cop Manish Mishra) असं या व्यक्तीचं नाव आहे. जवळपास दहा वर्षापासून ते ग्वाल्हेरमध्ये भीक मागतात. मात्र मनीष हे मध्य प्रदेश पोलीस दलात (Madhya Pradesh Police) पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI या पदावर कार्यरत होते. PSI पदावरील व्यक्ती रातोरात भिकारी कसा बनला त्याची ही कहाणी. (Manish Mishra Gwalior cops journey Police to beggar)

मनीष मिश्रा हे सध्या ग्वाल्हेरमधील स्वर्ग सदन आश्रमात आहेत. त्यांना भेटण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची रांग लागली आहे. ही रांग चौकशीसाठीच आहे, पण ही चौकशी गुन्ह्याच्या तपासाची नाही तर आपुलकीची आहे. मनीष यांना भेटण्यासाठी येणारे हे पोलीस तेच आहेत, जे मनीष यांच्यासोबत ट्रेनिंगला होते, त्यांचे बॅचमेट होते.

बॅचमेट्सना मित्र भेटला

मनीष यांची कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला आठवडाभर मागे जावं लागेल. ही कहाणी आहे बिहार निवडणुकीच्या निकाला दिवशी किंवा आयपीएलच्या फायनल होती त्या दिवसाची, म्हणजेच 10 नोव्हेंबरची. याच दिवशी मध्य प्रदेशातही पोटनिवडणूक होती. मतमोजणी पार पडल्यानंतर, रात्रीच्या बंदोबस्तासाठी दोन अधिकारी डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना थंडीने काकडणारा एक भिकारी दिसला.

भिकाऱ्याला मदत

हा भिकारी थंडीने अक्षरश: गारठून गेला होता. मुरगळून पडलेला भिकारी पाहून, पोलिसांना त्याच्यावर दया आली. यापैकी एका पोलिसाने त्या भिकाऱ्याला आपला बूट तर दुसऱ्याने जॅकेट दिल्याचं सांगितलं जातं. यानंतर दोन्ही अधिकारी तिथून निघत होते, तितक्यात भिकाऱ्याने दोन्ही पोलिसांना त्यांच्या नावाने हाक मारली.

भिकारी आपल्या नावाने हाक मारतोय हे पाहून दोन्ही पोलीस थोडे चकीत झाले. दोघेही त्याच्या जवळ गेले आणि भिकाऱ्याची अधिक विचारपूस केली. त्यावेळी भिकाऱ्याने दिलेली माहिती ऐकून दोघांनाही धक्का बसला. हा भिकारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर आपला बॅचमेट पोलीस उपनिरीक्षक मनीष मिश्रा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मनीष मिश्रा हे गेल्या दहा वर्षापासून रस्त्यावर भीक मागून मरण जगत असल्याचं दोन्ही पोलिसांना समजलं.

1999 बॅचचे पोलीस अधिकारी

ग्वाल्हेरच्या झाशी रस्त्यावर गेल्या दहा वर्षापासून बेवारस फिरणारे मनीष मिश्रा हे मध्य प्रदेशातील 1999 च्या बॅचचे पोलीस अधिकारी होते. शार्प शूटर अर्थात अचूक निशाण्यासाठी ते ओळखले जात होते. मात्र दहा वर्षापूर्वी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचं मानसिक संतुलन ढळलं. कुटुंबासोबत राहणारे मनीष मिश्रा सैरभैर झाले आणि कुटुंबापासून दूर निघून गेले.

आपला एक सहकारी रस्त्याच्या कडेला अशा अवस्थेत आढळल्याने, दोन्ही अधिकाऱ्यांना प्रचंड दु:ख झालं. दोघांनी मनीष यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी मनीष यांना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्वर्ग सदन आश्रमात दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार करुन देखरेख ठेवली जात आहे.

बहीण चीनमध्ये बड्या कंपनीत

मनीष मिश्रा हे शिवपुरीचे रहिवासी असून त्यांचे वृद्ध माता-पिताही याच गावात राहतात. मनीष यांची चुलत बहीण चीनमध्ये एका बड्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. आश्रमचालकांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधला असून, लवकरच मध्य प्रदेशला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे मनीष यांच्या पत्नीने आधीच घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

मनीष मिश्रा यांची कारकीर्द

मनीष मिश्रा हे पोलिसात भरती झाल्यानंतर, त्यांनी 2005 पर्यंत सेवा बजावली. त्यावेळी ते मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात कार्यरत होते. त्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन ढळलं. सुरुवातीचे 5 वर्ष ते घरीच होते. त्यांना उपचारासाठी जिथे जिथे दाखल केलं जात होतं, तिथून ते पळून जात होते. ते कुठे जात हे त्यांच्या कुटुंबियांनाही समजत नव्हतं. सध्या त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आश्रमाकडून होत आहे.

मनीष यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी त्यांच्या बॅचमेटनी केली आहे. मनीष यांना सामन्य आयुष्य जगण्यासाठी शक्य ते प्रयत्न करु, असं त्यांचे मित्र सांगतात.

(Manish Mishra Gwalior cops journey Police to beggar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI