Chandrayaan 2 : चंद्रयानाचा ‘चंद्रप्रवेश’, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा महत्त्वाचा टप्पा नुकतंच पार केला आहे. आज (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 2 मिनीटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.

Chandrayaan 2 : चंद्रयानाचा 'चंद्रप्रवेश', आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ (Chandrayaan 2) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा महत्त्वाचा टप्पा नुकतंच पार केला आहे. आज (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 2 मिनीटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.

“चंद्रयान 2 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चंद्रयानाला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी जवळपास 30 मिनीटांचा कालावधी लागल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.”

“चंद्रयान 2 या मोहिमेतील सर्वात कठीण आणि महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. यानंतर आता चंद्रयान दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रयान चंद्रावर उतरेल,” अशी माहितीही इस्त्रोच्या अध्यक्षांनी दिली.

“चंद्रयान 2 हे रात्री 3 च्या सुमारास चंद्राजवळ पोहोचले. त्यानंतर ते गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या संपर्कात आले आणि यामुळे चंद्रयानाचा चंद्रावरचा प्रवेश लवकर झाला,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर 2 सप्टेंबरला विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळे होईल. यानंतर सर्व लक्ष हे लँडरवर केंद्रीत केले जाईल. चंद्रयान येत्या 7 सप्टेंबरला दुपारी 1.55 मिनीटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल अशी माहिती के. सिवान यांनी दिली.

39,240 किलोमीटर प्रति तास वेग

चंद्रयान 2 (Chandrayaan 2) चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यापर्यंतची प्रक्रिया फार कठीण आहे. यासाठी प्रतितास 39,240 किलोमीटर वेगाची आवश्यकता आहे. हवेचा वेग हा आवाजापेक्षा जवळपास 30 टक्के जास्त आहे. या दरम्यान एखादी छोटीसी चूकही चंद्रयान 2 ला चंद्रापासून दूर करु शकते.

‘चंद्रयान-2’ चं (Mission Chandrayaan-2) श्रीहरीकोटा येथून 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं यशस्वी प्रक्षेपण झालं. त्यानंतर 16 मिनिटांनी चंद्रयान-2 बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली. यानंतर 14 ऑगस्टला चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले.

“चंद्रयान 2 च्या आतापर्यंतच्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. हे मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे,” असे इस्त्रोने स्पष्ट केले आहे.

चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये

 • चंद्रयान-2 पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण
 • मिशन चंद्रयान 2 मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्त्वात यशस्वी
 • दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार
 •  3,844 लाख किमीचं अंतर कापून भारताचं ‘चंद्रयान-2’ चंद्रावर पोहोचणार
 •  चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार
 •  दक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार, चंद्रवरील पाणी, खनिजांच शोध

चंद्रयान 2 चा प्रवास

 • 14 जुलै 2019 – सकाळी 6.51 पासून चंद्रयान 2 प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन सुरु
 • 15 जुलै 2019 – मध्यरात्री 2.51 वाजता चंद्रयान 2 प्रक्षेपण
 • 15 जुलै 2019 – तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण स्थगित
 • 22 जुलै 2019 – दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं यशस्वी प्रक्षेपण
 • 22 जुलै 2019 – प्रक्षेपण झाल्यानतंर 16 मिनिटांनी बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात
 • 14 ऑगस्ट 2019 – चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले.
 • 20 ऑगस्ट 2019 – सकाळी 9 वाजून 2 मिनीटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचले
 • 2 सप्टेंबर 2019 – विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळे होणार
 • 7 सप्टेंबर 2019 – चंद्रयानाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होईल.

संबंधित बातम्या  

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?   

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI