मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई-कोकण वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळली (Land Sliding) आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणकडे (Mumbai-Kokan) जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. सर्वाधिक परिणाम रेल्वेच्या डाऊन लाईनवर झाला आहे.

मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई-कोकण वाहतूक ठप्प
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 04, 2019 | 4:45 PM

रायगड : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळली (Land Sliding) आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणकडे (Mumbai-Kokan) जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. सर्वाधिक परिणाम रेल्वेच्या डाऊन लाईनवर झाला आहे. ल

डाऊन लाईनवरील राडारोडा हटवून मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

दरम्यान, ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस कोकणाला झोडपून काढतो आहे. जलाभिषेकाने गणरायाचे स्वागत केल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून आहे. सलग तिसऱ्या दिवशी तळकोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस होतो आहे. कुलाबा वेधशाळेनं 6 सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गौरी पुजनापर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याचा अंदाज आहे.

सर्वात जास्त पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात झाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम कोकणातील मासेमारीवर झाला आहे. समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो बोटी जयगडच्या बंदरात आश्रयाला आल्या आहेत. गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या आहेत. या ठिकाणी हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्गात दरड कोसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गगनबावडा घाटात मोठी दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरवरुन येणाऱ्या घाट रस्त्याच्या सुरुवातीलाच दरडीचा भाग कोसळला. त्यामुळे सिंधुदुर्ग ते कोल्हापूर जोडणाऱ्या घाटात अनेक वाहनं अडकली आहेत.

दक्षिण रत्नागिरीलाही रात्रीपासून पावसाने झोडपलं. राजापूर तालुक्यातील मुर तळवडे रस्त्यावर दरड कोसळली. जामदा खोऱ्यातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. येत्या 48 तासात आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नागोठण्यात पाणी शिरलं

रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पुंडलिका, अंबा, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागोठणे शहरात पाणी शिरलं आहे, तर पेणमधील खरोशी गावात गुडघाभर पाणी साचलं आहे. मुंबई-पुणे जुन्या हायवेवरुन एक्स्प्रेस वेला जाणाऱ्या जोडरस्त्याला खालापूरमधील सावरोल जवळील पुलावरुन पाणी जात असल्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. मात्र मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक सुरळीत असून जनजीवन मात्र विस्कळीत आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें