कुणी कुठे जायचं, हे सांगणारे राज ठाकरे कोण? : नयनतारा सहगल

कुणी कुठे जायचं, हे सांगणारे राज ठाकरे कोण? : नयनतारा सहगल


मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मनसेच्या विरोधामुळे ते निमंत्रण मागे घ्यावं लागलं. हा वाद वाढल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नयनतारा यांना आमचा विरोध नाही. त्यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे, असे स्पष्टीकरण दिले. यासंबंधी नयनतारा यांचं काय मत आहे, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टीव्ही 9 मराठीशी केलेल्या खास बातचीतमध्ये नयनतारा यांनी या वादावर त्यांचे मत स्पष्ट केले आहे.

नयनतारा यांनी सांगितले की, “92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी मोठ्या आनंदाने मला आमंत्रित केले आणि मी देखील ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर अचानक त्यांनी मला आणखी एक पत्र पाठवले, ज्यात ते आमंत्रण रद्द करण्यात आलं आहे, हे कळवण्यात आलं. पण त्यासाठीचं कुठलंही कारण त्यात स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. त्यामागील कारण मलाही माहित नाही, पण कदाचित त्यांच्यावर कुठला राजकीय दबाव असू शकतो असं मला वाटतं.”

मराठी साहित्यिकांच्या पांठिब्यावर नयनतारा म्हणतात की, “मला आनंद आहे की, ही बाब मराठी साहित्यकांपर्यंत पोहोचली आणि मला गर्व आहे की त्यांनी मला सपोर्ट केला. मी त्यांची आभारी आहे की त्यांनी मला पाठिंबा दिला.”

असहिष्णुतेवर नयनतारा सहगल यांचे मत-

“मीच नाही तर शेकडो लेखकांनी हे सांगितले आहे की त्यांच्यावरील दबाव वाढतो आहे आणि याला असहिष्णुता म्हणत नाही तर हत्या म्हणतात. ज्या लोकांचे विचार जरा वेगळे असतात त्यांची सरळ हत्या केली जाते. यात गौरी लंकेश यांच्यासारख्या मोठ्या लोकांचाही समावेश आहे. यासाठी कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कायद्याचे कुणी नावही घेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये तर पोलिसांचीच हत्या करण्यात आली. यावरुन देशातील कायदा व्यलस्थेची काय स्थिती आहे हे कळून येते.”- नयनतारा सहगल

“ही लोकशाही नाही तर हुकुमशाही”

“1975 साली जी आणीबाणी लागू करण्यात आली होती ती हुकुमशाही होती, मी तेव्हाही त्याचा विरोध केला होता. पण आज त्याहून वाईट परिस्थिती आहे. तरी हे सरकार याला लोकशाही म्हणत आहे. पण माझ्या मते ही देखील हुकुमशाहीच आहे”, असे नयनतारा सहगल यांनी सांगितले.

“कोण आहेत राज ठाकरे?”

“राज ठाकरे कोण आहेत, जे कुठल्याही भारतीय नागरिकाला हे म्हणतील की, मी तुम्हाला परवानगी देतो आहे येण्याची किंवा मी परवानगी नाही देत. जर हा एक स्वतंत्र देश आहे, तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की तो देशात कुठेही जाऊ शकतो. आपले विचार मांडू शकतो”, असे म्हणत नयनतारा सहगल यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“सर्व भाषांच्या साहित्याचा अनुवाद होणे आवश्यक”

“माझा मराठी साहित्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांचा मला खेद आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशात साहित्याचं अनुवादन सर्व भाषांमध्ये होत नाही. त्यामुळे आमच्यासारखे लोक इतर भाषिक साहित्य वाचू शकत नाहीत. एकमेकांचं साहित्य वाचणे हे भारतातील साहित्यिकांसाठी महत्वाचे आहे. भारतात 24 भाषांमध्ये साहित्य लिहिले जाते. पण आम्ही ते वाचू शकत नाही, त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखत नाही. याचे मला दुख: आहे”, असे मत नयनतारा सहगल यांनी व्यक्त केले.

माझं महाराष्ट्राशी नातं…

“माझं महाराष्ट्राशी नात माझ्या वडिलांच्या बाजूने आहे. माझे वडील हे मराठी होते. त्यामुळे माझं महाराष्ट्राशी खूप जवळचं नातं आहे. माझे आई-वडील दोघेही स्वातंत्र्यसेनानी होते. माझ्या वडिलांनी स्वातंत्र्यासाठी आपला जीव दिला. आज जे काही होत आहे ते माझ्या वडिलांना आणि त्या वेळेच्या लोकांना मान्य नसते. मी स्वातंत्र्याबाबत आवाज उठवत फक्त माझं कर्तव्य पार पाडत आहे”, असे नयनतारा सहगल यांनी स्पष्ट केले.

काय आहे वाद?

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी निवेदन प्रसिद्धी माध्यमांना दिलंय. या निवेदनाद्वारे त्यांनी नयनतारा सहगल यांना लेखी निमंत्रण दिलं होतं. सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतले आणि संमेलन उधळून टाकण्याची भाषा वर्तमानपत्रातून केली. त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निमंत्रण मागे घेण्यात आलंय.

कोण आहेत नयनतारा सहगल?

देशात दोन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसीची मालिकाच सुरु झाली होती. सर्वात अगोदर पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखिका म्हणून नयनतारा यांची ओळख आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या भाची आहेत. नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. पुरस्कार वापसीची कोणतीही तरतूद नसल्याने नयनतारा यांच्यासह 10 साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते.

92 व्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यंदा यवतमाळमध्ये करण्यात आल आहे. मराठी साहित्यिक सोडून इंग्रजी साहित्यिकांना निमंत्रण दिल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. पण महाराष्ट्रातल्या मराठी साहित्याचं मराठीपण जपलं जावं ही आपल्या सहकाऱ्यांची इच्छा आहे, जी योग्य आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटल होतं.

संपूर्ण मुलाखत-

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI