एमजीएम कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या हत्येचं गूढ उकललं!

एमजीएम कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या हत्येचं गूढ उकललं!

औरंगाबाद : एमजीएम मेडिकल कॉललेजच्या मुलींच्या वसतिगृहातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने तरुणीची हत्या केली. यावेळी तरुणीवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेशातील राहुल शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 10 डिसेंबर 2018 रोजी हत्येची घटना घडली होती.

राहुल शर्मा हा मजूर असून, तो चोरीच्या उद्देशाने तरुणीच्या रुममध्ये घुसला होता. त्यावेळी त्याने तरुणीवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला.

घटना काय घडली होती?            

औरंगाबादमध्ये एमजीएम कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली होती. एमजीएम महाविद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेत शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्याने पोलीसांसमोर मोठ आव्हान निर्माण झालं होतं.

एमजीएम महाविद्यालयाच्या ‘गंगा मुलींचे वसतीगृह’ येथे खोली क्रमांक – 334 मध्ये विद्यार्थिनी राहत होती. दहा डिसेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास ती वसतिगृहातील तिच्या खोलीत आली. तेव्हापासून ती खोलीतून बाहेर आली नाही. ती बाहेर न आल्याने वसतिगृह निरीक्षकाने खोली उघडली. त्यावेळी विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत खोलीत पडलेली त्यांना दिसली. तिला घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असलं, तरी शवविच्छेदन अहवालात तिची हत्या झाल्याचं समोर आलं.

एमजीएमच्या मुलींच्या वसतिगृहात ही घटना घडल्याने अनेक संशय पोलिसांना होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तीन पथकं निर्माण करून या प्रकारणाचा तपास सुरु करण्यात आला. इतकेच नाही तर वसतिगृहाच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर विद्यार्थिनीच्या हत्येचं गूढ उकललं.

Published On - 7:38 am, Tue, 18 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI