पालघरवासीय भूकंपाच्या दहशतीत, नागरिकांना घराबाहेर झोपण्याचं आवाहन

पालघरवासीय भूकंपाच्या दहशतीत, नागरिकांना घराबाहेर झोपण्याचं आवाहन

पालघर: भूकंप आणि भयकंप इथला संपेना अशीच अवस्था पालघर इथल्या जनतेची झाली आहे. पालघर आणि परिसराला  भूकंपाचे धक्के सातत्याने बसत आहेत. काल 1 फेब्रुवारीलाही अनेक धक्क्यांनी पालघरला हादरवलं. भूकंपाच्या भीतीने 2 वर्षीय मुलीचा घाबरून पळत असताना मृत्यू झाल्याने, भूकंपाचा पहिला बळी पालघर जिल्ह्यात गेला आहे. 11 नव्हेंबरपासून 25 जानेवारीपर्यंत सलग तब्बल 12 जोरदार धक्के आणि असंख्य सौम्य ,मध्यम धक्के बसले. त्यामुळे इथे असं एकही घर उरलं नसावे ज्यांना तडे गेले नाहीत. रविवारी 20 जानेवारी रोजी 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा आतापर्यंतचा सर्वाधिक धरणीकंप झाला. त्यामुळे इथले नागरिक भयभीत आहेत. काल 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजल्यापासून सलग एकापेक्षा एक असे एकूण 6 मोठे धक्के बसले. त्यामुळे इथले नागरिक दहशतीत आहेत.

तलासरी आणि डहाणू परिसर  शुक्रवारी रात्री 3:25 पासून सतत हादरत होता. संध्याकाळपर्यंत 15 पेक्षा जास्त सौम्य आणि जोरदार धक्के जाणवले. त्यापैकी सकाळी 6:58 वाजता 3.3 रिश्टर स्केल,10:03 वाजता 3.5 रिश्टर स्केल, आणि 10:29 वाजता पुन्हा एकदा 3 रिश्टर स्केल 2 वाजून 6 मिनिटांनी पुन्हा 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी  3.5 ,3.6 असे एकूण 6 मोठे धक्के बसल्याने परिसरात एकूणच घबराटीचे वातावरण होते. शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी शाळा इमारतीला जोरदार धक्के बसल्याने सर्व मुले घाबरून वर्गाबाहेर पडली होती.अनेक नागरिक घराबाहेर पडलेली पाहायला मिळाली.

धुंदलवाडी, दापचरी, वांकास,चिंचले, हळदपाडा परिसरात तर सतत भूकंपाचे हादरे चालूच आहे .या परिसरात गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाची मालिका सुरू असून आतापर्यंत शेकडो वेळा सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अनेक घरांना तडे जाऊन घरं पडण्याचा मार्गावर आली आहेत. तर काही घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून घराचा पाया, भिंती खचल्या आहेत.  पालघर ग्रामीण परिसरातील बांधकाम भूकंप प्रवण क्षेत्रावर आधारित नसून 4 ते 5 रिस्टर स्केल इतका क्षमतेचा भूकंप जरी झाला, तरी वारंवार बसणाऱ्या धक्क्यांनी परिसरातील अनेक घरे कोलमडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी या भूकंपाची तीव्रता तलासरी, वडवली,सावरोली, कवडा,वरखंडा, जांभळून पाडा, शिसणे, करंजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, दापचरी,सासवंद, गांगणगाव, आदी भागातील लोकांनी अनुभवली. गेल्या तीन  महिन्यापासून या परिसरात सौम्य आणि जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र 4.1 रिस्टर स्केलच्या भूकंपानंतर प्रशासनही कामाला लागले आहे , त्यातच एक 2 वर्षीय मुलीचा घाबरून पळत असताना मृत्यू झाल्याने भूकंपाचा पहिला बळी पालघर जिल्ह्यात पडला आहे.

जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात काल भूकंपाचे 6 धक्के जाणवले आहेत. परिस्थितीनुसार प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून, आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आरोग्य विभागास त्यांची यंत्रणा विशेषत: भूकंपप्रवण भागात तैनात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

रहिवाशांच्या सोयीसाठी एनडीआरएफ मार्फत 150 तंबू मागविण्यात आले असून ते पोहोचताच या परिसरातील डहाणू आणि तलासरी भागातील रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दक्षता म्हणून ज्या रहिवाशांची घरे कच्च्या बांधकामाची आहेत, त्यांनी रात्री घराबाहेर झोपावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

11 नोव्हेंबर – 3.2 रिश्टर स्केल

24 नोव्हेंबर – 3.3 रिश्टर स्केल

1 डिसेंबर – 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल

4 डिसेंबर – 3.2 रिश्टर स्केल

7 डिसेंबर – 2.9 रिश्टर स्केल

10 डिसेंबर – 2.8 आणि  2.7 रिश्टर स्केल

20 जानेवारी 3.6 – रिश्टर स्केल

24 जानेवारी – 3.4 रिश्टर स्केल

1 फेब्रुवारी 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल

संबंधित बातम्या 

पालघरमधील भूकंपाच्या धक्क्यांचा पहिला बळी, घाबरुन पळताना मुलीचा मृत्यू 

Published On - 10:05 am, Sat, 2 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI