विजेच्या समस्येवर तोडगा, बीडच्या शेतकऱ्यांना स्वतःची डीपी मिळणार

परळी मतदारसंघातील पांगरी आणि घाटनांदूर येथून हा शुभारंभ होईल. 175 कोटी रुपयांच्या या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विजेच्या समस्येवर तोडगा, बीडच्या शेतकऱ्यांना स्वतःची डीपी मिळणार

बीड : पाणी नसल्यावर शेतकऱ्यांची तारांबळ तर होतेच, पण पाणी असूनही अनेकदा विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे हातचं पीक जातं. याच समस्येचा सामना करण्यासाठी बीडमधून शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंजूर करुन आणलेल्या ‘एक शेतकरी, एक रोहित्र’ (डीपी) योजनेच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी परळीतून होत आहे. परळी मतदारसंघातील पांगरी आणि घाटनांदूर येथून हा शुभारंभ होईल. 175 कोटी रुपयांच्या या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. व्होल्टाज कंपनी आणि संभाजी गिते (अंबाजोगाई) यांच्या इलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. या कंपनीला कामाचं कंत्राट देण्यात आलंय. येत्या दीड वर्षात हे काम कंपनीला पूर्ण करण्याचं लक्ष्य देण्यात आलंय.

पांगरी आणि घाटनांदूर या ठिकाणी रोहित्र वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. यावेळी पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार उपस्थित असतील.

शेतकऱ्यांना हक्काची आणि कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी पंकजा मुंडे यांनी वीज वितरण कंपनीकडून ही अभिनव योजना मंजूर करून आणली. अलीकडे भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विजेचा तुटवडा जाणवतो. परिणामी पिके वाळून जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक डीपी असेल तर त्यावर किमान 25 पेक्षा अधिक शेतकरी कनेक्शन घेतात. ज्यामुळे डीपी खराब होण्याचे किंवा विद्युत पुरवठा न टिकण्याचे प्रमाण वाढते.

गेल्या तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी अर्ज केला आहे त्यांना या योजनेअंतर्गत कनेक्शन मिळू शकते. हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन अर्थात एच.व्ही.डी.सी.अशी ही योजना आहे. विशेष म्हणजे काम चालू झाल्यानंतर जिल्ह्यातील दोन हजार लोकांना या कामातून रोजगार मिळणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI