पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं

गाडी चालक मनोज सातपुते यांना मारहाण करत मारुती ओमनी गाडीतून मुंबई येथून अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा ता. पारनेर, जि. नगर येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आलं. मनोज सातपुते यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय.

पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना 5 जुलै रोजी घडली. गाडी चालक मनोज सातपुते यांना मारहाण करत मारुती ओमनी गाडीतून मुंबई येथून अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा ता. पारनेर, जि. नगर येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आलं. मनोज सातपुते यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय. हे अपहरण कुणी आणि कशासाठी केलं याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मनोज सातपुते यांच्या तक्रारीनुसार, ते 5 जुलैला रात्री 8 वाजता मुंबईतील कुलाबा बेस्ट डेपोजवळून खाजगी काम करुन आमदार निवासाकडे जात होते. त्यावेळी एक लाल रंगाची ओमनी गाडी सातपुते यांच्याजवळ आली आणि काही प्रश्न विचारले. तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला त्यांना भेटायचं आहे. त्यांचा पत्ता आम्हाला सापडत नाही. त्यांना एक वस्तू द्यायची आहे, असं म्हणून सातपुते यांना गाडीच्या पुढच्या सिटवर बसवलं.

या वेळी गाडीत पाठीमागच्या बाजूला एकजण बसलेला होता. त्याच्याशी माझं काहीच बोलणं झालं नाही, असं सातपुते यांनी सांगितलं. गाडी कुलाबा सर्कलला येईपर्यंतचं सर्व आठवतंय, मात्र त्यानंतरचं काही आठवत नाही. दुसऱ्या दिवशी सहा जुलै रोजी सकाळी 8 वाजता पुणे-नगर महामार्गावर सुपे येथे मी रस्त्याच्या कडेला पडल्याचं माझ्या लक्षात आलं, असं त्यांनी जबाबात सांगितलं आहे.

पार्थ पवारांचे चालक असणारे मनोज सातपुते हे मूळचे सणसवाडी येथील राहणारे आहेत. सुपा येथील घटनास्थळावरुन एसटी बसने सणसवाडी येथे येऊन खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आई-वडिलांसमेवत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत.

पुढील तपास कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या चालकाला मारहाण करुन अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामागे कुठलं कारण आहे हे समजू शकलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI