बँकेत खातं उघडण्यासाठी गेला आणि निरव मोदीच्या मुसक्या आवळल्या

बँकेत खातं उघडण्यासाठी गेला आणि निरव मोदीच्या मुसक्या आवळल्या

लंडन : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटींपेक्षा अधिकचा चुना लावून फरार झालेला डायमंड किंग निरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली. निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळत त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा आरोपी अखेर बँकेतच पकडला गेला. लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात सुनावणीवेळी ही माहिती देण्यात आली. मेट्रो बँक ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने सतर्कता दाखवत निरव मोदीला पकडण्यास मदत केली. मंगळवारी तो बँकेत खातं उघडण्यासाठी गेला होता.

बँक क्लर्कने घोटाळेबाज निरव मोदीला ओळखलं आणि तातडीने स्कॉटलंड यार्डला माहिती दिली. काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि निरव मोदीला बेड्या ठोकल्या. निरव मोदी लंडनमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्य राहत होता. याच ठिकाणी तो राहत असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणाही आता निरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी कामाला लागल्या आहेत. कर्जबुडव्या विजय मल्ल्यापेक्षा निरव मोदीचं प्रकरण वेगळं आहे. त्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया जलद होईल, असं जाणकारांचं मत आहे. निरव मोदीने बँकेला फसवल्याचे मजबूत पुरावे भारताकडे आहेत, ज्यामुळे त्याचं प्रत्यार्पण वेगाने होऊ शकेल. ईडीने निरव मोदीविरोधात लंडनच्या कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात अटक वॉरंट निघाला होता आणि अखेर त्याला बँकेतून अटक करण्यात आली.

निरव मोदीकडे तीन पासपोर्ट आले कुठून?

निरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर तीन पासपोर्ट तयार केले. लंडन पोलिसांनी निरव मोदीला जेव्हा वेस्टमिन्स्टर कोर्टात हजर केलं, तेव्हा त्याच्याकडे तीन पासपोर्ट असल्याची माहिती मिळाली. भारतीय तपास यंत्रणांनी निरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. त्याच्याकडे जे पासपोर्ट आहेत, त्यापैकी एक आता लंडन पोलिसांकडे आहे, दुसरा ब्रिटनच्या गृहविभागाकडे आहे, ज्याची तारीख संपली आहे. तर तिसरा पासपोर्ट ब्रिटनच्या वाहन परवाना विभागाकडे आहे.

निरव मोदीकडे या पासपोर्टशिवाय विविध देशांचे रहिवासी प्रमाणपत्र असल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं. यापैकी काही कागदपत्रांची वैधता संपलेली आहे. निरव मोदीकडे ज्या देशांचे रहिवासी कार्ड आहेत, त्यामध्ये यूएई, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. निरव मोदीकडे एवढे पासपोर्ट आले कसे याबाबत सध्या तपास सुरु आहे. बनावट पासपोर्ट काढणं हा जगभरात गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे याबाबतही त्याच्यावर खटला दाखल होऊ शकतो.

Published On - 7:58 am, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI