हल्ल्याचा कट उधळला, दहशतवाद्याकडून श्रीनगर एअर बेसचा नकाशा जप्त

  • Updated On - 3:36 pm, Fri, 5 July 19 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
हल्ल्याचा कट उधळला, दहशतवाद्याकडून श्रीनगर एअर बेसचा नकाशा जप्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील पंजगाम सेक्टर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आले.  यातील एका दहशतवाद्याचे नाव शौकत मोहम्मद डार असे असून तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. त्याच्याकडून श्रीनगर एअर बेसचा नकाशाही जप्त करण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचा पुलवामाप्रमाणेच  हल्ला पुन्हा करण्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरक्षा दलांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. सुरक्षा दलाला पंजगाम सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री 2 वाजताच्या सुमारास सुरक्षा दलांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केले. सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु आहे. सुरक्षा दलाकडून या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून, स्थानिक लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यातील एक दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा आहे. शौकत मोहम्मद डार या दहशतवाद्याचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. शौकतने जून 2016 मध्ये दहशतवादी संघटना सामील झाला होता. घटनास्थळावरुन 56 रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलाच्या जवानांकडून पुलवामाच्या मुर्रान गावात आणखी दहशतवादी लपले आहेत का? याचे शोधकार्य सुरु आहे.

तर दुसऱ्या ठिकाणी, जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुलवामा आणि शोपियां येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचा नसीर पंडित, उमर मीर आणि खालिद हे मारले गेले होते. खालिद हा जैशचा कमांडर होता तो पाकिस्तानमध्ये राहत होता. तर दुसऱ्या एका चकमकीत जवानांनी शोपियांमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI