पुणे अग्नितांडव : मालक बाहेरुन कुलूप लावून जायचा, कामगार आत झोपायचे!

पुणे अग्नितांडव : मालक बाहेरुन कुलूप लावून जायचा, कामगार आत झोपायचे!

पुणे : उरुळी देवाची इथं राजयोग साडी डेपोच्या अग्नितांडवात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालकाची बाहेरुन कुलूप लावून दुकान बंद करण्याची सवय पाच जणांच्या जीवावर बेतली आहे. आग लागताच दुसऱ्या मजल्यावरील कामगार खाली आले. मात्र बाहेरुन कुलूप लावल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. कामगारांनी  दुकान मालकाला फोनवरुन याबाबत माहिती दिली. मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीत होरपळल्याने आणि धुराने जीव गुदमरुन पाच जणांचा मृत्यू झाला.

राकेश मेहवाल,राकेश रियाड,धर्मराम बडीयासर,सुरज शर्मा आणि धीरज चांडक अशी या दुर्दैवी कर्मचाऱ्यांची नावं आहेत. मृतातील चौघे राजस्थानचे असून, धीरज चांडक हा कामगार लातूरचा होता.

सर्व मृत हे राजयोग साडी सेलच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. रात्री अचानक आग लागली. यावेळी काही कामगारांनी मालकाला फोन केला होता. मात्र मालक दुकानाला बाहेरुन कुलूप लावून दुकान बंद करत असे आणि कामगार रोज दुकानात झोपत असत.

आगीची महिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत आणि बचावकार्य सुरु केलं. मात्र बाहेरुन दुकानाला कुलूप असल्यानं अडथळा आला. यानंतर जेसीबीच्या मदतीनं दुकानाची मागील भिंत फोडून बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या पाच फायरगाड्या आणि खाजगी दहा टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या  आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. आग कशामुळे लागली, दुकानात आग प्रतिबंधक उपाययोजना होत्या का, याचा तपास सुरु आहे.

राजयोग साडी डेपोचे मूळ मालक राजीव भाडाळे असून, त्यांनी हे दुकान गुजरातच्या प्रजापती या व्यक्तीला चालवायला दिले आहे.

VIDEO:

Published On - 11:24 am, Thu, 9 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI