सिनेमात कामाचं आमिष दाखवत बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग

सिनेमात कामाचं आमिष दाखवत बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग

मीरा रोड (ठाणे) : सिनेमात काम देतो, असे अमिष दाखवत बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळील मीरा रोड येथे उघडकीस आली आहे. 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सिनेमात काम देण्याचं अमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना मिरा रोडमध्ये घडली. दानेश अन्सारी आणि शमशाद खान अशी बलात्कार करणाऱ्या नराधमांची नावं असून, नवघर पोलिसांनी दोघाही नराधमांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नवघर येथील एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकत होती. त्याच कॉलेजमध्ये शमशादही शिकत होता. कॉलेजमध्ये असताना पीडित मुलीची व शमशादची चांगली ओळख होती. मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्याने पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले. या गोष्टीचा राग काढण्यासाठी शमशादने पीडित मुलीचा मोबाईल नंबर त्याचा मित्र दानेशला दिला. दानेशने तिला फोन करुन सिनेमात काम देण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री केली.

त्यानंतर दानेशने तिला गोराईतील एका हॉटेलमध्ये ऑडिशन असल्याचे सांगितले. पीडित तरुणी ऑडिशन देण्यासाठी गेली असता, तिचे ऑडिशन घेण्याचे नाटक रचले. त्यानंतर जेवणात गुंगीचे औषध देत तिला बेशुद्ध केले. बेशुद्ध झाल्यानंतर दानेशने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि याचा व्हिडीओही तयार केला. यानंतर या दोघांनी पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने हा सर्व प्रकार घरी आई-वडिलांना सांगितला.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांना नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दानेश आणि शमशाद या दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI