मराठवाड्यात महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, यंत्रणा 5 दिवस ठप्प, शेतकऱ्यांचे पंचनामे रखडणार

मराठवाड्यातील महसूल यंत्रणा आगामी 5 दिवस ठप्प राहणार असल्याने अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

मराठवाड्यात महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, यंत्रणा 5 दिवस ठप्प, शेतकऱ्यांचे पंचनामे रखडणार

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील महसूल यंत्रणा आगामी 5 दिवस ठप्प राहणार असल्याने अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मनमानी कारभाराला वैतागून विविध मागण्यांसाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी 2 दिवसाच्या सामूहिक रजेवर जाणार असून काम बंद आंदोलन करणार आहेत. (Revenue Employees Agitation In Marathwada Farmer Panchnama Will Be Delayed)

महसूल विभागाने पुकारलेल्या आंदोलनात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, कारकून तसेच तलाठी सहभागी होणार असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याची व मदतीची प्रक्रिया रखडणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी या  आठही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

अव्वल कारकून यांना नायब तहसीलदार, नायब तहसीलदार यांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यासह विभागीय चौकशी व फौजदारी प्रकरणात आरोप असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देणे तसेच अन्य जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेने हे सामूहिक रजा व काम बंद आंदोलन पुकारले आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आंदोलनात गावपातळीवरील तलाठी, कोतवाल सहभागी होणार आहेत, अशी माहिती महसूल संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष माधव मैदपवाड यांनी दिली. मागण्या मान्य न झाल्यास 20 नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महसूल अधिकारी व कर्मचारी बुधवारी 28 व गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी काम बंद आंदोलन करणार असून 30 ऑक्टोबरला शुक्रवारी ईद असल्याने सुट्टी आहे. तर 31 ऑक्टोबर रोजी शनिवार व 1 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारीच कामकाज सुरू होणार आहे. आगामी 5 दिवस प्रशासकीय कामकाज ठप्प राहणार असल्याने पीक नुकसानीचे पंचनामे व नागरिकांची इतर कामे ठप्प राहणार असून मोठी अडचण होणार आहे.

औरंगाबाद महसुल विभाग वगळता इतर विभागातील अधिकारी यांच्या पदोन्नती झाल्या आहेत मात्र विभागीय आयुक्त केंद्रेकर या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याने 2 दिवसाने आंदोलन पुकारले आहे, असे मैदपवाड म्हणाले.

(Revenue Employees Agitation In Marathwada, Farmer Panchnama Will Be Delayed)

संबंधित बातम्या

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI