मनी लॉड्रिंग प्रकरणी सोनिया गांधींच्या जावयाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मनी लॉड्रिंग प्रकरणी सोनिया गांधींच्या जावयाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयात हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर शनिवारी 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. हे मनी लॉड्रिंग प्रकरण रॉबर्ट वाड्रा यांचे जवळचे सुनिल अरोरा यांच्याशी निगडीत आहे. वाड्रा यांनी याच प्रकरणी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

सुनिल अरोरा यांच्यावर ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने सुनिल अरोराला 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. 5 जानेवारीला ईडीने अरोरा विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यासाठी पटियाला हाऊस न्यायालयात धाव घेतली होती.

लंडनच्या 12, ब्रायनस्टन स्क्वेअर येथील 19 लाख पाउंड म्हणजेच जवळपास 17 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या खरेदीमध्ये मनी लॉड्रिंग लॉड्रिंग झाल्याचा आरोप आहे. या संपत्तीचे खरे मालक हे राबर्ट वाड्रा असल्याचा दावा ईडीने केला होता. वाड्रा यांच्या परदेशातील या अघोषित संपत्तीसाठी अरोरानेच निधीची व्यवस्था केली, असा ईडीचा दावा आहे. वारंवार समन्स बजावूनही अरोरा हजर रहात नाही, असे ईडीचे म्हणणे होते.

लंडनची ही प्रॉपर्टी फरार डिफेंस डिलर संजय भंडारीने विकत घेतल्याची माहिती आहे. ईडी नुसार, भंडारीने ही प्रॉपर्टी 16 कोटी 80 लाख रुपयांत विकत घेतली. त्यानंतर भंडारीने 2010 साली ही प्रॉपर्टी याच किंमतीत वड्राच्या फर्मला विकली होती. याच्या दुरुस्तीवर 61 लाख 61 हजाराचा अतिरिक्त खर्च आला होता. तरीही भंडारीने घेतल्या त्याच किंमतीत याची विक्री केली होती. भंडारीवर अधिकृत गुप्त कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published On - 11:32 pm, Fri, 1 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI