ऐश्वर्यावरील विवेक ओबेरॉयच्या ट्वीटवर सलमान म्हणतो…

ऐश्वर्यावरील विवेक ओबेरॉयच्या ट्वीटवर सलमान म्हणतो...


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खानचे मीम्स ट्वीट केल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयला 24 तासांच्या आत माफी मागण्याची वेळ आली. त्यानंतर सलमान खानचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमानने विवेक ओबेरॉयच्या ट्वीटवर उत्तर देताना उपरोधात्मकपणे निशाणा साधला.

विवेकच्या ट्वीटनंतर सलमान काय उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर सलमान खानने या विषयावर आपले मौन सोडून प्रतिक्रिया दिली. सलमान खान म्हणाला, “मी याकडे लक्ष देत नाही. पहिल्याप्रमाणे आता ट्वीटही करत नाही, तर मीम्स कोठून पाहू? मी काम करु की कमेंट पाहू, मीम्स पाहू. मी याकडे अजिबात लक्ष देत नाही.”

दरम्यान आज विवेक ओबेरॉयने ट्वीट करत माफी मागितली. तसेच ऐश्वर्याबाबत केलेले ट्वीटही डिलीट केले. विवेक म्हणाला, “अनेकदा विनोदी आणि कुणाला दुखावणार नाही असं वाटतं, पण ते दुसऱ्यालाही तसंच वाटेल असं होत नाही. मी 10 वर्षांपासून 2 हजार मुलींच्या उज्वल भविष्यासाठी काम केले आहे. मी कोणत्याही महिलेला अपमानित करण्याचा विचारही करु शकत नाही.” आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये विवेक म्हणाला, “माझ्या मीममुळे जर कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी माफी मागतो. ट्वीट डिलिट केले आहे.”

विवेकच्या माफीनंतर सलमान खानने थेट काही भाष्य केले नसले, तरी त्याने विवेकला टोमणाही मारला. सलमान खान सध्या त्याच्या भारत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे विवेक ओबेरॉय बऱ्याच वर्षांनी आपल्या चित्रपटाच्या रिलीज डेटची वाट पाहात आहे. विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये मोदींची भूमिका केली आहे.

विवेक ओबेरॉयच्या आक्षेपार्ह ट्वीटवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी जोरदार प्रतिक्रिया देत निषेध केला आहे. मात्र, बच्चन कुटुंबीयांकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI