दोन मुलींना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न, मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु

दोन मुलींना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न, मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु

सोलापूर : जन्मदात्या आईने आपल्या दोन मुलींना विष पाजून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील ही घटना आहे. विष पाजल्यामुळे दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय, तर आईवर सध्या उपचार सुरु आहेत. एक मुलगी चार, तर दुसरी दोन वर्षांची होती. आईने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

नान्नज गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांच्या शेतात कुटुंब राहत आहे. ते शेतमजुरी करून आपली उपजीविका भागवत होते. शनिवारी सकाळी कौटुंबीक कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. याचा राग मनात धरून दुपारी रेष्मा कृष्णा भोसले यांनी आपल्या दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले (वय 4) आणि श्रेया (वय 2) यांना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेलं कराटे नावाचं विषारी द्रव्य पाजलं.

स्वतःही औषध पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत शेजारील काही व्यक्तींनी रेष्मा यांना बाहेर काढलं. या घटनेने नान्नज आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI