श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज 8 साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात 207 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटातील मृतांमध्ये 3 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृत्यू झालेल्या तीन भारतीय नागरिकांची नावे आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आज दिवसभरात 8 बॉम्बस्फोट झाले. आज ईस्टर संडेच्या निमित्ताने कोलंबो शहरात उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी सकाळी 8.45 च्या सुमारास कोलंबोमधील सेंट अँटनी चर्च येथे स्फोट झाला. त्यानंतर थोड्या वेळाने सेंट सेबस्टियन चर्च (नेगंबो), शांग्रिला फाईव्ह स्टार हॉटेल, सिनमन ग्रँड फाईव्ह स्टार हॉटेल, किंग्सबरी फाईव्ह स्टार हॉटेल, सेंट अँथनी चर्च (कोलंबो) या ठिकाणी स्फोट झाले.

ईस्टर संडेच्या दिवशीच ख्रिश्चन समाजाला लक्ष्य करण्याच्या हेतूने चर्च आणि हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणल्याचा श्रीलंकेतील पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटानंतर श्रीलंका हादरली आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच भारतातील सर्व विमानतळांवरील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या कोलंबो शहरात झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 3 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृत झालेल्या तीन भारतीयांची नावे आहेत. तसेच याबाबत सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

दरम्यान श्रीलंकेमधील या स्फोटांमध्ये 450 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर कोलंबोतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीलंका पोलिसांकडून 7 संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच अफवा रोखण्यासाठी श्रीलंकन सरकारकडून फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर

श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेल्या किंवा तिथे राहत असलेल्या भारतीयांना मदत हवी असल्यास, श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. +94777903082, +94112422788, +94112422789 या नंबरवर श्रीलंकेतील भारतीय नागरिक संपर्क करु शकतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI