वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एसआरपीएफच्या जवानाची गळफास घेत आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एसआरपीएफच्या जवानाची गळफास घेत आत्महत्या


हिंगोली : राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पीडित जवानाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू मंदाडे असे या मृत जवानाचे नाव आहे. ते जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील रहिवासी होते.

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जवान मंदाडे बुधवारी (24 एप्रिल रोजी) रजेवर आले होते. रजेवर येण्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठांचे नेमणूक आणि अतिरिक्त काम यावरुन खटके उडाले होते. याच त्रासाला कंटाळून विष्णू मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

कुटुंबीयांनी सांगितले, ‘विष्णू मंदाडे प्रामाणिक जवान होते. ते वरिष्ठ सांगतील ती कामे करायचे. मात्र, वरिष्ठ याचा फायदा घेत त्यांची वारंवार दूरदूर नेमणूक करायचे आणि पिळवणूक करायचे. कुणीही गैरहजर राहिल्यास त्याचा भार विष्णू मंदाडेंवर दिला जायचा.’

‘जवळ नेमणूक हवी असेल, तर वरिष्ठांना पैसे पुरवावे लागत’

जवळ नेमणूक (ड्युटी) हवी असेल, तर वरिष्ठांना पैसे पुरवावे लागत होते, असा गंभीर आरोपही मृत जवान मंदाडेंच्या कुटुंबीयांनी केला.

दरम्यान, मृत जवानाच्या कुटुंबीयांनी वरिष्ठांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. याबाबत आम्ही हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॅमेऱ्यासमोर या विषयावर बोलण्यास नकार दिला. बाळापूर पोलिसांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी उत्तर दिले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI