‘स्टार्टअप’मध्ये गुजरात अव्वल, यूपी, बिहारही महाराष्ट्राच्या पुढे

'स्टार्टअप'मध्ये गुजरात अव्वल, यूपी, बिहारही महाराष्ट्राच्या पुढे

मुंबई : स्वतःच्या पायावर उभं राहणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य होत नाही. परिणामी बेरोजगारी एक मोठी समस्या निर्माण होते. तर दुसरीकडे एक असा वर्ग आहे, ज्यांना स्वतःच्या बळावर काही तरी करण्याची इच्छा आहे. जगापेक्षा वेगळं करण्याचं या वर्गाचं स्वप्न आहे. या वर्गाच्या स्वप्नांना बळ देते ती स्टार्टअप योजना. या योजनेत गुजरातने […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : स्वतःच्या पायावर उभं राहणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य होत नाही. परिणामी बेरोजगारी एक मोठी समस्या निर्माण होते. तर दुसरीकडे एक असा वर्ग आहे, ज्यांना स्वतःच्या बळावर काही तरी करण्याची इच्छा आहे. जगापेक्षा वेगळं करण्याचं या वर्गाचं स्वप्न आहे. या वर्गाच्या स्वप्नांना बळ देते ती स्टार्टअप योजना. या योजनेत गुजरातने अव्वल स्थान मिळवलंय. पण महाराष्ट्र सरकारची या योजनेतील कामगिरी ही तरुणांच्या बेरोजगारीकडे लक्ष वेधणारी आहे.

2016 मध्ये केंद्र सरकारने स्टार्टअप इंडियाची सुरुवात केली. स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या युवांसाठी ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. या योजनेंतर्गत देशात आतापर्यंत 14600 पेक्षा जास्त स्टार्टअप आहेत. औद्योगिक धोरण आणि प्रमोशन विभागाने वेगवेगळ्या राज्यांनी 2018 वर्षात स्टार्टअपसाठी काय केलं, याची रँकिंग जारी केली आहे. यात गुजरातने अव्वल स्थान मिळवलंय.

काय आहे रँकिंग?

रँकिंग काढण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, मार्गदर्शक, इच्छुक मार्गदर्शक, उदयोन्मुखी राज्य आणि सुरुवात करणारे राज्य असं विभाजन करण्यात आलंय. महाराष्ट्राचा समावेश उदयोन्मुखी राज्यांमध्ये आहे.

सर्वोत्कृष्ट – गुजरात

उत्कृष्ट – कर्नाटक, केरळ, ओदिशा, राजस्थान

मार्गदर्शक – आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा

इच्छुक मार्गदर्शक – हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल

उदयोन्मुखी राज्यआसाम, दिल्ली, गोवा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू आणि उत्तराखंड

सुरुवात करणारे राज्य – चंदीगड (कें. प्र.), मणिपूर, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी(कें. प्र.), सिक्कीम आणि त्रिपुरा

रँकिंग कशाच्या आधारावर काढली?

नाविन्यीकरण ऊर्जा, अन्न, शिक्षण, शेती, आरोग्य, हार्डवेअर तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात गेल्या वर्षभरात देशात 14565 स्टार्टअपची नोंदणी करण्यात आली. गुजरातने स्टार्टअपसाठी 100 कोटींचा निधी पुरवला आणि जवळपास 200 प्रकल्पांना विविध प्रकारची मदत केली.

महाराष्ट्रात 14565 पैकी सर्वाधिक 2787 प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर कर्नाटक (2107), दिल्ली (1949), उत्तर प्रदेश (1201), हरियाणा (765) आणि गुजरातमध्ये 764 प्रकल्पांची नोंदणी झाली. स्टार्टअपसाठी निधी सहजासहजी मिळणे, पोषक वातावरण अशा विविध गोष्टींवर ही रँकिंग काढण्यात आली.

काय आहे स्टार्टअप योजना?

बेरोजगारी सोडवणे, शाश्वत विकास आणि मजबूत अर्थव्यवस्था असे अनेक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत यावर्षी रँकिंग काढण्यात आली आहे आणि कुणी किती प्रगती केली याचा आढावा घेण्यात आलाय. या योजनेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध राज्यातील 51 अधिकाऱ्यांना चॅम्पियन हा पुरस्कार देण्यात आला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें