सुभाषचंद्र बोस यांच्या नातीकडून नथुराम गोडसेच्या प्रतिमेची आरती

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यालयात नथुराम गोडसेच्या प्रतिमेची राज्यश्री चौधरींनी पूजा केली.

सुभाषचंद्र बोस यांच्या नातीकडून नथुराम गोडसेच्या प्रतिमेची आरती

भोपाळ : स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या नातीने महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेची आरती केल्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. बोस यांच्या पुतण्याची कन्या असलेल्या राज्यश्री चौधरी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष (Subhashchandra Bose Grandniece Worships Godse) आहेत.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसेच्या प्रतिमेची चौधरींनी पूजा केली. राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यश्री चौधरी आणि हिंदू महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निशा कटोच यांनी गोडसेची प्रार्थना केली होती.

जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारमुळे गांधींजींची हत्या झाली, असा आरोप चौधरी आणि कटोच यांनी ठेवला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हिंदू महासभेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी पोलिसांना दिले होते. राज्यात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण अजिबात सहन केलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

काँग्रेस सरकार नथुराम गोडसेची विचारसरणी राज्यात फोफावू देणार नाही आणि त्याची पूजा करणाऱ्या घटकांवर कारवाई करेल, असं राज्यमंत्री गोविंद सिंह यांनी स्पष्ट केलं.

गोडसेचं गुणगान गाणारी पत्रकं वाटत महात्मा गांधींना फाळणीसाठी जबाबदार धरल्याबद्दल हिंदू महासभेचे प्रवक्ते नरेश बाथम यांच्याविरोधात शुक्रवारी कलम 133 अ अन्वये गुन्हा दाखल (Subhashchandra Bose Grandniece Worships Godse) करण्यात आला होता.

गांधीजींच्या प्रतिमेवर झाडली होती गोळी

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारीला हिंदू महासभेच्या काही सदस्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर त्या पुतळ्याच्या आतील बाटली फुटून त्यातून लाल रंगाचं रक्तसदृश द्रव्य खाली सांडल्याचं दिसलं होतं.

यावेळी पूजा पांडेसोबत असलेल्या लोकांनी नथुराम गोडसेचा जयजयकार केला होता. गोळी मारल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाईही वाटली होती. त्यानंतर पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली होती, तर तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI