पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांची नावं पाठीवर कोरली

पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांची नावं पाठीवर कोरली

शामली (उत्तर प्रदेश) : जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशातून पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान अनेकजण जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने अनोख्या पद्धतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने चक्क आपल्या अंगावर शहीद झालेल्या 40 जवानांची नावं गोंदवून घेतली आहेत. यासोबतच त्याने जवानांच्या नावांसोबत ‘वंदे मातरम’ही लिहिले आहे. ‘विजय पवार’ असं या देशभक्त तरुणाचं नाव आहे.

“जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येकजण त्याला वेग-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहतात. मात्र काही दिवसांनी लोक ही गोष्ट विसरुन जातात. मला माझ्या शहीद जवानांना कायम आठवणीत ठेवण्यासाठी मी माझ्या अंगावर जवानांची नावं गोंदवून घेतली आहेत. जेव्हा पण मी कपडे काढेन तेव्हा माझ्या अंगावर मला ही नावं दिसतील”, असं विजय पवार म्हणाला.

तो पुढे म्हणाला “नावं गोंदवून घेताना मला किती त्रास झाला यापेक्षा जवानांच्या आई, पत्नी, बहीण, मुलगा आणि भाऊ त्यांना झालेल्या त्रासापेक्षा नावं गोंदवून घेण्याचा त्रास फार कमी आहे”.

विजय पवारने देशभक्तीसाठी या आधीही अनेक गोष्टी केल्या आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. नुकतेच विजयने शामली ते काश्मीर प्रवास सायकलवरुन पूर्ण करण्यासाठी तो निघाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी प्रशासनाने 160 किमी प्रवास पुर्ण झाल्यावर सहारनपूर येथे थांबवले. विशेष म्हणजे या प्रवासासाठी विजयने आपल्या स्वत:च्या रक्ताने जवानांसाठी पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने ‘भारत माता की जय’ आणि पुलवामा हल्ल्याचा निषेध त्याने केला होता.

विजयने अंगावर नावं गोंदवून घेतल्यापासून तो अंगावर शर्ट जास्त घालत नाही आणि भारताचा झेंडा घेऊन चालतो. त्याला पाहून प्रत्येकजण सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI