घरफोडीसाठी ट्रेन, विमानांचा वापर, ‘हायप्रोफाईल’ चोरांच्या टोळीला बेड्या

घरफोडीसाठी ट्रेन, विमानांचा वापर, ‘हायप्रोफाईल’ चोरांच्या टोळीला बेड्या

पुणे : चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळया शक्कल लढवतात. वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा, उपकरणांचा वापर करत हे चोरटे चोरी करतात. कधी दुचाकी तर कधी सायकलवर येत घरफोड्या करतात. मात्र, याच्याही पुढे जात चक्क विमानातून येऊन शहरात घरफोड्या करणार्‍या हायप्रोफाइल चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी चार गुन्ह्यांतील पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या चोरांची चोरीची ही पद्धत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

वाहीद खुर्शीद मन्सुरी (33), रियासत रियाजुद्दीन मन्सुरी (28), रिजवान निजामुद्दीन शेख (25) फैसल जुल्फीकार अन्सारी (22), मोहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी ऊर्फ सलमान अन्सारी (27), नफासत वहीद अन्सारी (29), मुशरफ यामीन कुरेशी (35) अशी रेल्वे आणि विमानाने येऊन घरफोडी करणाऱ्या चोरांची नावे आहेत.

मोहम्मद अन्सारी आणि नफासत अन्सारी हे दोघे उत्तर प्रदेशमधून पुण्यात विमानाने येत होते, तर इतरांकडे पिस्तूल व इतर वस्तू असल्याने ते रेल्वेने शहरात यायचे. पुण्यात आल्यानंतर रिक्षाचालक वाहीद खुर्शीद मन्सुरी आणि मुशरफ यामीन कुरेशी या दोघांच्या घरी, तर कधी हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस थांबून घरफोड्या करून हे चोरटे पसार व्हायचे.

काही दिवसांपूर्वी कोंढव्यात नरेश मल्होत्रा आणि शक्ती ननवरे यांच्या फ्लॅटमध्ये दिवसा-ढवळ्या घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस करत होते. यावेळी चोरटे रिक्षाचा वापर करत असल्याचं सीसीटीव्हीच्या पडताळणीत स्पष्ट झालं. रिक्षाच्या समोरच्या बाजूला 313 हा क्रमांक लिहिलेला होता. त्यावरून पोलिसांनी आपली चक्रे फिरवली. या तपासात ही रिक्षा निगडीतील असल्याचं समोर आलं. यानंतर  रिक्षाचालक वाहीद मन्सुरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वाहीद मन्सुरीची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने इतर साथीदारांसोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून रियासत मन्सुरी, रिजवान शेख, फैसल अन्सारीला अटक केली. सध्या हे सर्व चोरटे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Published On - 3:46 pm, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI