नक्षलग्रस्त भागातील बहिणींच्या जिद्दीला यश, माडीया समाजातील पहिल्या महिला डॉक्टर

ध्येयाने पछाडलेल्या कोमल आणि पायल मडावी झिंगानूरमधील बहिणींनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करत मोठं यश मिळवलं आहे.

नक्षलग्रस्त भागातील बहिणींच्या जिद्दीला यश, माडीया समाजातील पहिल्या महिला डॉक्टर

गडचिरोली : मनात जिद्द असली तर माणूस संघर्ष करत परिस्थितीवर मात करतो आणि आपलं यश मिळवतो म्हणतात ना, जेव्हा रस्ता चांगला आहे, तेव्हा नक्की विचारा तो कुठे जातो. मात्र जेव्हा उद्देश, ध्येय चांगलं असतं, तेव्हा विचार करू नका की रस्ता कसा आहे. याच ध्येयाने पछाडलेल्या कोमल आणि पायल मडावी झिंगानूरमधील बहिणींनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करत मोठं यश मिळवलं आहे (First Doctor from Madia Community). त्या माडीया समाजातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. या दोघी बहिणींची जिद्द निश्चित समाजाला प्रेरणा देणारी आहे.

झिंगानूर हे गाव सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावरील आदिवासी आणि अविकसित गाव आहे. याच गावातील कोमल श्यामला कासा मडावी हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. तिची बहिण पायल श्यामला कासा मडावी ही देखील एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. कोमलने 1 ली ते 3 री पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा झिंगानूर येथे घेतलं. 4 थीचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल सिरोंचा येथे अतिबिकट परिस्थितीत पूर्ण केलं. यानंतर पुढे शिक्षणासाठी सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालय गाठले. तिनं 5 वी ते 10 वीपर्यंतचं शिक्षण सिरोंचा येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केलं.

कोमलची आई आरोग्य विभागात आरोग्य सेविका, तर वडील गावीच शेती करतात. ती सिरोंचा येथे शिक्षणासाठी आल्यानंतर तेथील शिक्षकांनी तिला चांगलं प्रोत्साहन दिलं. 10 वी झाल्यानंतर कोमलने थेट नागपूर गाठलं. तिनं आपलं 11 वी आणि 12 वीचं शिक्षण कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथून पूर्ण केलं. येथेच 12 वी नंतर एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातून (यवतमाळ) तिने एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टरची पदवी घेतली.

मनात जिद्द असली तर काहीही शक्य होऊ शकतं, हे डॉ. कोमलने दाखवून दिलं. कोमलची लहान बहिण पायल देखील सध्या नागपूर येथे शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षाला शिकत आहे. या दोन्ही बहिणी गावात राहतात. ते गाव अजूनही मागासलेलं क्षेत्र मानलं जातं. या गावात दिवसातून एकदाच बस जाते. पावसाळ्यात बस सेवाही बंद असते. अनेकदा 10-10 दिवस विद्यूत सेवा खंडीत असते. आई आरोग्य विभागात कार्यरत असल्यामुळे मुलींनी डॉक्टर बनावं, अशी कोमलच्या आई श्यामला नागुला यांची इच्छा होती. आता डॉ. कोमल पदव्युत्तर शिक्षण (पी.जी.) घ्यावं, अशी इच्छा कोमलच्या आईने बोलून दाखवली आहे.

कोमलच्या आईला वडिलांचीही चांगली साथ मिळाली. तानी चित्रपट पाहिल्यामुळे कोमलच्या वडिलांच्या मनातही आपल्या मूलींनी शिकून काही तरी बनावे याची इच्छा निर्माण झाली. एका रिक्षावाल्याची मुलगी कलेक्टर बनू शकते, तर तुम्ही चांगल्या पदावर का जाऊ शकत नाही ही प्रेरणा दिली. शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा हा विशाल दृष्टीकोनच मुलींना प्रेरणादायी ठरला. त्यांनी खूप उत्साहाने व आनंदाने प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रांची जमवा-जमव केली. विशेष म्हणजे कोलमच्या आई-वडीलांनी मुलाची अपेक्षा न करता मूलींना कसं घडवता येईल यावरच लक्ष दिलं. मूलींनीही आई-वडीलांच्या कष्टाचा आणि विश्वासाचं चिज केलं.

कोमलच्या आई-वडीलांचा आंतरजातीय विवाह झालेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही अनेक स्तरावर सामाजिक संघर्ष करावा लागला. मात्र, यानंतरही त्यांनी मोठ्या चिकाटीने आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिलं. यामुळे झिंगानूर गावात त्यांच्या या यशाने अनेकांना प्रोत्साहन मिळणार आहे.

गडचिरोली जिल्हा मागासलेला आहेत. त्यातच जिल्ह्यातील माडीया समाज खूप पिछाडीवर आहे. अशा समाजातून कोमल पहिली महिला डॉक्टर झाली आहे. याचा खूप मोठा आनंद तिच्या कुटुबीयांसह तिच्या गावाला आहे.

कोमलला शाळेत असताना फक्त माडीया भाषा बोलता येत होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाची सूरुवात भाषेच्या अडचणीने झाली. मात्र, तिने परिस्थीतीचा बाऊ करणं टाळत भाषेच्या अडचणीवरही मात केली. तिच्या शिक्षिका बैस, शिक्षक विलास बोलगोडवार यांनी तिला यात मदत केली. कोमल आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि प्रत्येक टप्यावर मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मित्र-मैत्रिणींना देते. तिने आपल्या कामातून आपली मेहनतच आपले भाग्य उजळू शकते हा संदेश दिला आहे. कोलम म्हणाली, “परिस्थितीचा बाऊ करणे टाळावे. आपल्याला आपली प्रगती साधता आली की प्रगतीचा रस्ता नक्कीच मोठा होत जातो.”

First Doctor from Madia Community

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI