शिवेंद्रराजे म्हणाले खांदा कशाला दाबताय, उदयनराजे म्हणाले फिटनेस बघतोय

शिवेंद्रराजे म्हणाले खांदा कशाला दाबताय, उदयनराजे म्हणाले फिटनेस बघतोय


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील द्वंद्व उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही राजे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन करत शाब्दिक चिमटे काढले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला. शिवेंद्रराजे यांनीही मोठ्या मनाने त्यांना दाद देत माझा सारखा खांदा का दाबताय? असे म्हणाले. त्यावर दिलखुलासपणे उदयनराजे भोसले यांनी फिटनेस बघत आहे, असा टोला मारला. तर शिवेंद्रराजे यांनीही चाणाक्षपणे माझा फिटनेस कायमच चंगळ असून कधीही प्रात्यक्षिक दाखवायची तयारी असल्याचा टोला लगावला. त्यानंतर दोघेही हसत-हसत मार्गस्थ झाले.

दोन्ही राजेंना हसतमुखाने एकत्र पाहत सर्वात मोठा सुटकेचा निःश्वास जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घेतला असेल. कारण, प्रसंग कोणताही असो. साताऱ्यात दोन्ही राजेंमधला संघर्ष हा ठरलेला आहे. दोन्ही राजेंच्या समर्थकांकडून रस्त्यावर उतरण्यापर्यंत हा संघर्ष जातो.

दोन्ही राजेंमधल्या वादाची मालिका

दोन्ही राजेंमध्ये सातारा नगरपालिकेच्या निकालानंतर खरा वाद सुरु झाला. शिवेंद्रराजेंच्या पत्नीचा या निवडणुकीत पराभव झाला. उदयनराजेंच्या आघाडीला या निवडणुकीत यश मिळालं. पण पत्नीचा पराभव झाल्यामुळे शिवेंद्रराजे दुखावले आणि यानंतर दोन्ही राजेंमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला.

दीड वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्याचा ठेका उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून गेल्यानंतर तो आता कोल्हापूर येथील एकाच्या ताब्यात गेला आहे. मात्र या टोलनाक्याची जबाबदारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडे गेल्याने दोन राजघराण्यातील वाद उफाळून आला होता. हा वाद टोलनाक्यापुरता मर्यादित राहिला नसून यामुळे दोन्ही राजेंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

सातारा शहरातील गणेश विसर्जनाचा वाद हा शिगेला पोहोचला होता. सातारा शहरातील गणेश विसर्जन करायचं कुठे हा प्रश्न उभा राहिला होता. न्यायालयाने शहरातील तळ्यात गणपती विसर्जनावर बंदी आणल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सातारा शहरातील प्रतापसिंह शेती फार्मच्या आवारात कृत्रीम तळे काढून यामध्ये विसर्जन केले जायचे. मात्र याचा खर्च 50 लाखापर्यंत खर्च होत असल्यामुळे यावर सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तळ्यातच गणपती विसर्जन करणार अशी न्यायालयाच्या विरोधात भूमिका ठेवत साताऱ्यातील गणेश भक्तांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार तळे हे माझ्या मालकीचं असून या तळ्याबाबत निर्णयही मीच घेणार अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली होती.

26 ऑक्टोंबर 2018 रोजी सातारा शहरातील जुन्यामोटार स्टॅन्ड परिसरात असणाऱ्या दारुच्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यावरुन दोन राजेंचा वाद झाला. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक रविंद्र ढोणे यांचे दारुचे दुकान या परिसरात आहे. मात्र ही जागा उदयनराजे भोसले यांचे समर्थक समीर खुटाळे यांची असल्यामुळे दुकानाच्या जागेचा वाद सुरु झाला. ही न्यायप्रविष्ट बाब बनली आहे.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI