तुळजाभवानीच्या खजिन्यातील 71 पुरातन नाणी गायब

तुळजाभवानीच्या खजिन्यातील 71 पुरातन नाणी गायब

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील 71 ऐतिहासिक आणि पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

तुळजाभवानी मातेला निजाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चारणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये 1980 पर्यंत होती. मात्र 2005 आणि 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन 71 नाण्यांसह प्राचीन सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले आहे.

तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची  मागणी केली होती त्यात 71 पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले आहे. देवीला अर्पण केलेल्या या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील सोने चांदी अपहाराची कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतानाच पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI