सोशल मीडियाच्या अति वापराने मुलींना डिप्रेशनचा धोका

सोशल मीडियाच्या अति वापराने मुलींना डिप्रेशनचा धोका

लंडन : सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लहान मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचा अतिरेक डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरु शकतो. लंडन कॉलेज विद्यापीठाच्या अभ्यासातून हा दावा करण्यात आलाय. शिवाय मुलींना कमी सोशल मीडिया वापरण्याचा सल्लाही देण्यात आलाय.

दिवसातल्या पाच तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवणाऱ्या 40 टक्के मुलींमध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसून आली आहेत. तर हेच प्रमाण मुलांमध्ये 15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 14 वर्ष वयोगटातील 11 हजार मुलींचा संशोधकांनी अभ्यास केलाय.

सोशल मीडियाचा वापर आणि डिप्रेशनची लक्षणे यांचा संबंध मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त आहे. मुली जेवढा वेळ जास्त घालवतात, तेवढं डिप्रेशन अधिक वाढतं. मुलांच्या बाबतीत, जे दिवसाचा तीन तास किंवा अधिक वेळ सोशल मीडियावर असतात, त्यांच्यात नैराश्याची अधिक लक्षणे दिसतात, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

सोशल मीडिया आणि डिप्रेशन यांच्यातील संबंधाची कारणं समजून घेण्याचा प्रयत्नही संशोधकांनी केला. ऑनलाईन राहण्याच्या सवयीमुळे 40 टक्के मुलींना झोपही लागत नाही. तर हाच आकडा मुलांच्या बाबतीत 28 टक्के आहे. मुलींच्या बाबतीत इंटरनेटवरून छळणूक होण्याचे प्रकार जास्त असल्यामुळेही नैराश्य येत असल्याचं समोर आलंय.

सोशल मीडियासाठी वय हे ठराविक राहिलेलं नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती सोशल मीडिया वापरतो. पण याचा अतिरेक आता नैराश्यासाठी कारणीभूत ठरु लागल्याचं संशोधनातून समोर आलंय. स्मार्टफोनची सवय हा एक मानसिक आजार असल्याचं यापूर्वी अनेक संशोधनातून समोर आलंय, पण आता मुलींच्या बाबतीतलं हे संशोधन चिंता वाढवणारं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI