जुगाड नव्हे, टेक्निक! जॅकच्या मदतीने घर 3 फूट वर उचललं!

जुगाड नव्हे, टेक्निक! जॅकच्या मदतीने घर 3 फूट वर उचललं!

नागपूर : नागपुरात घराच्या बांधकामासंदर्भातील कामासाठी अख्खं घरच्या घर उचललं गेलंय आणि तेही तीन फूट वर उचललंय. यासाठी बांधकाम क्षेत्रातील जॅक या खास तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय. परदेशात असे प्रयोग पाहायला मिळतात. तसे व्हिडीओही आपण यूट्यूबवर पाहिले असाल. मात्र, नागपुरात सुद्धा जॅकचा हा प्रयोग करण्यात आला.

जॅकच्या सहाय्याने घराला वर उचलण्याचे प्रयोग परदेशात सर्रास केले जातात. दिल्ली आणि पुण्यातही असे प्रयोग झालेत. मात्र, नागपुरात पहिल्यांदाच असे अचाट काम करण्यात आले. रस्त्यांची उंची वाढल्याने अख्खे घरच उचलून त्याची उंची वाढवण्याचे प्रयोग सुरु आहे.

बांधकाम क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर हा प्रयोग नागपुरातील टेका नाका परिसरात पाहायला मिळतोय. यासाठी कुरुक्षेत्र येथील तज्ज्ञ चमू गेल्या 20 दिवसांपासून कामाला लागली असून त्यांनी दीड फूट घराला उंच उचलण्यात यशही मिळवले आहे. घराला उचलण्याचा हा प्रयोग नवीन आहे. मात्र घर खाली गेल्याने ते पाडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही हा प्रयोग केला. यामुळे घरासाठी लागणारी जवळपास 60 टक्के रक्कम वाचणार आहे. यासाठी 6 लाखांपर्यंत खर्च येत असल्याचे घर मालक सांगतात.

टेका नाका परिसरातील बुद्धाजीनगर येथील गुरुद्वाराजवळ हरपाल सिंह मेहता राहतात. 1993 मध्ये त्यांनी तीन हजार चौरस फूट जागेवर 1600 चौरस फुटांचे घर बांधले. कालांतराने घरासमोर रस्ते बनल्याने रस्त्यांची उंची वाढली. रस्त्याच्या तुलनेत घर खाली झाल्याने पावसाचे पाणी थेट घरात घुसत होते. यावर तोडगा कसा काढायचा, या विचारात हरपाल सिंह होते. या काळात त्यांना अख्खे घरच उंच उचलता येत असल्याचे कळले. त्यांनी कुरुक्षेत्र येथील या उद्योगाशी संबंधित कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांनी 160 जॅकच्या सहाय्याने हे घर उचललं. यावेळी एक करार सुद्धा करण्यात आला, त्यानुसार घर वर उचलत असताना नुकसान झाल्यास त्यास काम करणारी कंपनी जबाबदार राहील.

घराला उंच करण्यासाठी कुरुक्षेत्रातील तंत्रज्ञांनी त्याला 160 जॅक लावले आहेत. घराची कुठलीही तोडफोड न करता घर उंच करण्यात येत आहे यासाठी आणखी 20 ते 25 दिवस लागतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI