VIDEO: हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळलं, विचलित करणारा थरारक व्हिडीओ

VIDEO: हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळलं, विचलित करणारा थरारक व्हिडीओ


लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हुंड्यासाठी सुनेला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरमधील राजघाटच्या हजारीपूरमध्ये हुंड्याच्या लोभापायी सासरच्यांनी सून पूनमला जिवंत जाळलं. यानंतर उपचारादरम्यान पूनमचा मृत्यू झाला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हजारीपूरमध्ये 9 एप्रिलच्या रात्री ही थरारक घटना घडली.

पूनमच्या सासरकडील मंडळी तिला माहेरुन पाच लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकत होते. याबाबत अनेकदा तिच्या सासरचे आणि माहेरच्यांमध्ये चर्चाही झाली, त्यानंतर तडजोडही झाली. तरीही पूनमच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता.

9 एप्रिलच्या रात्री पूनम हिचा सासरच्यांशी हुंड्यावरुन वाद सुरु होता. त्यानंतर ती घरातून बाहेर आली आणि काही वेळाने पुन्हा घरात गेली. घराचा उंबरठा ओलांडताच तिच्या सासरच्यांनी अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवलं. त्यानंतर पूनम तडफडत घराबाहेर आली. तिची ही तडफड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आगीमुळे पूनम जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान 10 एप्रिलला तिचा मृत्यू झाला.

पूनमच्या माहेरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. पूनमच्या घरच्यांनी तिच्या सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पूनमचा पती, सासू-सासरे आणि दिरासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI