महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात गेल्यावर पुन्हा परतणाऱ्यांसाठीही कोविड टेस्ट बंधनकारक: विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या व्यक्तिला परत राज्यात परतायचे असेल तर त्यालाही कोविड टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (vijay wadettiwar on maharashtra government issues new covid-19 guidelines)

  • संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 21:10 PM, 23 Nov 2020
महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात गेल्यावर पुन्हा परतणाऱ्यांसाठीही कोविड टेस्ट बंधनकारक: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या व्यक्तिला परत राज्यात परतायचे असेल तर त्यालाही कोविड टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 25 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (vijay wadettiwar on maharashtra government issues new covid-19 guidelines)

विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अहमदाबादला तर नाईट लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद आणि सुरत ही दोन्ही शहरं मुंबईजवळ असल्याने येथील नागरिक मुंबईत येऊ शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने राज्यात विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गांनी येणाऱ्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. तसेच महाराष्ट्रातील लोक जर इतर राज्यात जात असतील तर येताना त्यांनाही कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक राहणार आहे. त्यांच्याकडे कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट नसेल त्याला टेस्ट करणं बंधनकारक राहणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी नको

दरम्यान, धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेडकर अनुयायांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर गर्दी केली नाही. त्यामुळे येत्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीही आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर गर्दी करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेबाचंच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने आंबेडकरी जनतेने घरीच थांबावं. चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. (vijay wadettiwar on maharashtra government issues new covid-19 guidelines)

 

संबंधित बातम्या:

कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश; दिल्ली, राजस्थान, गोव्यातील प्रवाशांसाठी ठाकरे सरकारची नियमावली

कोरोनाबाबत काय उपाययोजना? महाराष्ट्र-दिल्लीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी

(vijay wadettiwar on maharashtra government issues new covid-19 guidelines)