विद्यार्थ्यांनो, गणिताला पर्याय सापडला!

विद्यार्थ्यांनो, गणिताला पर्याय सापडला!

मुंबई : गणित हा विषय अनेक शालेय विद्यार्थ्यांसाठी अवघड ठरतो. गणिताची भीती बाळगणारेही मोठ्या संख्येत असतात. मात्र या भीतीवर पर्यायाने गणित विषयावर राज्याचं शिक्षण खातं जालीम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आठवी इयत्तेनंतरच्या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी कला हा विषय पर्याय म्हणून देण्यावर सरकार विचार करत असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपुरात एका शाळेला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी गणित आणि कला विषयांच्या पर्यायासंदर्भात माहिती दिली. शिवाय, इतरही अनेक विषयांवर विनोद तावडे यांनी आपली मतं मांडली.

गणित विषयाबद्दल नेमके काय म्हणाले विनोद तावडे?

इयत्ता आठवीनंतर विद्यार्थ्यांना गणित विषयाला पर्याय म्हणून कला विषय देण्याचा विचार सरकार करत आहे. येत्या दोन वर्षात गणिताला कला विषयाचा पर्याय देण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. तसेच, काही दिवसांपूर्वी गणिताला पर्याय देण्याचा विचार केला होता, तेव्हा गणिताचे शिक्षक माझ्या अंगावर आले होते, त्यामुळे या निर्णयाला उशिर झाला आहे, असेही यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडायला हवं!

विद्यार्थ्यांना नव्या वर्षाचा संकल्प करायला हवा, असे म्हणत विनोद तावडे यांनी संकल्प काय करायचा यासंदर्भात बोलताना सांगतिले, “टीव्ही, मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुलामी वाढली. सायबर गुलामीच्या विरोधात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडायला हवं. आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी तीन तास 7 ते 10 इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरु नका. तीन तास मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप वापरु नका. नवीन वर्षांचा हा संकल्प करा. हा नागपूर पॅटर्न यशस्वी झाल्यास राज्यभर हा पॅटर्न राबवू.”, असे विनोद तावडे म्हणाले.

आणखी काय म्हणाले विनोद तावडे?

  • यावेळी विनोद तावडे यांनी आयसीएससी आमि सीबीएसई शाळांनाही इशारा दिला. ते म्हणाले, “ज्या आयसीएससी आणि सीबीएसई शाळेत सातवीपर्यंत मराठी शिकवत नाहीत, त्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल.”
  • तसेच, शाळांनी दप्तराचं ओझं वाढवलं तर थेट मला इमेल करा, असेही आवाहन विनोद तावडे यांनी केले.

दरम्यान, नागपूर भेटीदरम्यान विनोद तावडे यांनी निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनाही श्रद्धांजली वाहिली. सर्वोदय आश्रमात जाऊन विनोद तावडेंनी राज्य सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI