मातंग आरक्षणासाठी तरुणाची धरणात उडी, मृत्यूपूर्वी व्हिडीओ संदेश

बीड: मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका तरुणाने धरणात जलसमाधी घेतल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून आपला संदेश रेकॉर्ड करुन ठेवला आहे. संजय ताकतोडे असं या तरुणाचं नाव आहे. दलित समाजाला 13 टक्के आरक्षण आहे. यामध्ये मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी जय लहुजी […]

मातंग आरक्षणासाठी तरुणाची धरणात उडी, मृत्यूपूर्वी व्हिडीओ संदेश
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:19 PM

बीड: मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी एका तरुणाने धरणात जलसमाधी घेतल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून आपला संदेश रेकॉर्ड करुन ठेवला आहे. संजय ताकतोडे असं या तरुणाचं नाव आहे.

दलित समाजाला 13 टक्के आरक्षण आहे. यामध्ये मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी जय लहुजी या संघटनेने केली होती. मात्र सरकारकडून आरक्षणासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नसल्याची खंत व्यक्त करत, संजय ताकतोडे या तरुणाने पालीच्या धरणात जिवंत जलसमाधी घेतली.

सध्या राज्यात दलितांना 13 टक्के आरक्षण लागू आहे. मात्र दलित समाजातून मातंग समाज हा लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मातंग समाजाला 13 टक्क्यामधून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जय लहुजी या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यासाठी नागपूर आणि मुंबईत मोर्चेदेखील काढण्यात आले होते. मात्र सरकारकडून यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याचा आरोप संजय ताकतोडेने केला.

याच रागातून संजयने काल रात्री कुटुंबातील सदस्यांना फोनवर संपर्क साधून, कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर आज सकाळी केजहून त्याने थेट पाली येथील धरण गाठले.  तिथे त्याने मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारबद्दल खंत व्यक्त केली.

“सध्या समाज भीषण परिस्थितीत आहे. त्यामुळे सरकारने मातंग समाजाबद्दल योग्य पाऊले उचलावीत” अशी मागणी त्याने व्हिडीओच्या माध्यमातून केली. त्यानंतर जय लहुजी असे म्हणत पालीच्या धरणात संजयने उडी घेऊन आत्महत्या केली.

या आत्महत्येला सराकार जबाबदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा दाखल करावा अशी मागणी संजयच्या भावाने केली आहे.

दरम्यान ही घटना गंभीर असून सरकारच्या हलगर्जीपणामुळेच संजयला जीव गमवावा लागल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केली.

ही घटना सकाळी घडली होती. त्याआधी संजयचा व्हिडीओ व्हायरल झाला. संजयने आत्महत्या कुठे केली याची कल्पना कोणालाच नव्हती, मात्र धरण परिसरातील काही लोकांनी पोलिसांना माहिती कळवली. बीड ग्रामीणचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह हा संजय ताकतोडे याचा असल्याचे स्पष्ट झाले.

संजयने जिवंत जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संजयच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

VIDEO:


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें