दररोज साडेनऊ तास बैठं काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम अधिक

दररोज साडेनऊ तास बैठं काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम अधिक

लंडन : दररोज सातत्याने एकाच जागेवर बसून केलेलं काम तुमच्या जीवावर बेतू शकतं. दिवसभरात साडेनऊ तास बसून राहिल्यास मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींमध्ये मृत्यू लवकर होण्याची जोखीम वाढते, असा निष्कर्ष ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकामध्ये (British Medical Journal – BMJ) प्रकाशित केलेल्या संशोधनात्मक अध्ययनात काढण्यात आला आहे.

झोपेची वेळ वगळता, दिवसभरात साडेनऊ तास किंवा त्याहून अधिक काळ बैठं काम केलं, तर लवकर मृत्यूचा धोका वाढतो. त्याउलट, अधिक शारीरिक हालचाली केल्यास लवकर मृत्यूचा धोका कमी होतो, असं यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही दररोज साडेनऊ तास बैठं काम करत असाल, तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

दररोज 24 मिनिटं गतीने चालणं शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचं या अध्ययनात म्हटलं आहे. निष्क्रिय किंवा कमी शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम अर्ध्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवसाला तीनशे मिनिटं (पाच तास) शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम कमालीची घटल्याचं पाहायला मिळालं आहे. आजकाल बरेच दिवसाचे नऊ ते दहा तास कार्यालयात घालवतात. कॉम्प्युटरसमोर बसून सलग काम केल्याने डोळे, मान, पाठ यासारख्या अवयवांवर परिणाम होतोच. त्याशिवाय आता हा धोकाही समोर आला आहे.

अर्थात, या वेळा सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींनी स्वतः नोंदवलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नेमकं किती वेळ शारीरिक हालचाल करण्यात यावी, हे अस्पष्ट आहे. कोणत्या वयात शारीरिक हालचाली जास्त कराव्यात, त्याची तीव्रता किती असावी, याबाबतच कोणतेही मापदंड नाहीत.

हे संशोधन अमेरिका आणि पाश्चिमात्य युरोपात केले गेल्यामुळे इतर देशातील नागरिकांना कितपत लागू होऊ शकतं, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र भारतात अशाप्रकारचं सर्वेक्षण घेण्यासाठी ते मार्गदर्शक निश्चितच ठरु शकतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *