या वाईट सवयींमुळे जडू शकतो निद्रानाशाचा विकार, आजच सोडा या सवयी अन्यथा…

चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणेही महत्वाची ठरते. शांत व पुरेशी झोप ही मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी तर महत्वपूर्ण असतेच, पण त्यामुळे अनेक फायदेही मिळतात. झोपेत अडथळा आणणाऱ्या काही सवयींचा त्याग केला पाहिजे.

या वाईट सवयींमुळे जडू शकतो निद्रानाशाचा विकार, आजच सोडा या सवयी अन्यथा...
| Updated on: Jul 26, 2023 | 5:20 PM
Bad habits causing insomnia : आपले चांगले व निरोगी आरोग्य हवे असेल तर चांगली जीवनशैली, पौष्टिक आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप (enough sleep) घेणेही खूप महत्वपूर्ण ठरते. कारण आपण जेवढी चांगली झोप घेऊ तेवढा चांगला आपला मूड असेल. आपल्या मनाचे आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यात झोपेचा महत्वाचा वाटा असतो.
जेव्हा आपण चांगली किंवा पुरेशी झोप घेतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायू दुरुस्त होतात. झोप पूर्ण झाली नाही तर निद्रानाशाचा (insomnia) त्रास सतावू शकतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, सुस्ती आणि कामात मन न लागणे असा त्रास जाणवू शकतो.  अनहेल्दी आणि चुकीची लाईफस्टाइल हे झोप पुरी न होण्यामागचे खरे कारण आहे. तसेच धावपळीच्या जीवनात लोक अशा काही पदार्थांचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असते व त्यामुळे थेट आपल्या झोपेवर परिणा होऊन झोपेत अडथळा येऊ शकतो. म्हणूनच चांगली व शांत झोप लागेल अशा पदार्थांचे सेवन करणे उत्तम ठरते.
निद्रानाशासाठी काही वाईट सवयी कारणीभूत ठरतात, त्या लवकरात लवकर सोडवाव्यात. 
  1. कॅफेनचे अतिसेवन टाळा – कॅफेनच्या जास्त सेवनामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो. म्हणूनच कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे चांगले असते. कॉफीमध्ये कॅफेन जास्त असते, त्यामुळे जास्त कॉफी पिणे टाळावे. चांगली झोप हवी असेल तर दुपारी 12 नंतर कॅफेनचे सेवन करू नये.
  2. सूर्यास्तानंतर जड व्यायाम टाळा – आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. बहुतेक लोक सकाळी व्यायाम करतात, तर काही संध्याकाळी. तुम्हीही संध्याकाळी व्यायाम करत असाल तर सूर्यास्त झाल्यावर जड व्यायाम करणे टाळावे. कारण संध्याकाळ ही आपल्यासाठी विश्रांतीची वेळ असते. म्हणूनच संध्याकाळी जड व्यायाम केलात तर निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
  3. रात्री उशीरा जेवू नका –  एका ठराविक वेळी आणि लौकर जेवणे कधीही उत्तम असते. सकाळी ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण वेळेवर करत असाल तर त्याचप्रमाणे रात्रीचे जेवणही ठराविक वेळी घ्यावे. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. सूर्यास्तानंतर तास – दोन तासांत जेवावे आणि हलका आहार घ्यावा. रात्री 9 नंतर जेवण टाळावे.
  4. रात्री मोबाईलचा अतीवापर टाळा – आजकाल बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फोनवर जास्त वेळ घालवतात, परंतु असे करणे हानिकारक आहे. रात्री जास्त फोन वापरल्याने झोपेवर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच झोपण्याच्या 1 तास आधी कोणतेही गॅजेट वापरणे, तसेच टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर  टाळणे हे उत्तम ठरते.
  5. सकाळचे ऊन अंगावर घ्या – सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी  (Vitamin-D) मिळते, जे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. तसच यामुळे झोपेची गुणवत्ताही सुधारते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Follow Us