भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही भारतीय जनता पक्षाने अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे, यामध्ये 56 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता भाजप आपल्या यादीत कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपच्या संसदीय समितिच्या बैठकीत अनेक नावांवर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती आहे. मात्र, या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकांसाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे. भाजपचे बडे नेते देशभरात सभा घेऊन मतदारांकडे मतं मागत आहेत. मात्र, कुठल्या मतदार संघातून कुठला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजप आपली उमेदवार यादी कधी जाहीर करणार, त्यात कुणाला उमेदवारी मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजप सोडल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली असून काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 तर राष्ट्रवादीने 15 नावं जाहीर केली आहेत. मात्र शिवसेना भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार भाजपने 7 नावं जवळपास निश्चित केली आहेत. त्याबाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.

भाजपच्या 7 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित:

  1. नागपूर – नितीन गडकरी
  2. चंद्रपूर – हंसराज अहीर
  3. जालना – रावसाहेब दानवे
  4. पुणे – गिरीश बापट
  5. अकोला – संजय धोत्रे
  6. भिवंडी – कपिल पाटील
  7. गडचिरोली – अशोक नेते

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *