नाशिक लोकसभा : शिवसेना खासदार हेमंत गोडसेंसमोर यंदा नवं आव्हान

नाशिक लोकसभा : शिवसेना खासदार हेमंत गोडसेंसमोर यंदा नवं आव्हान

नाशिक : काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शहर आणि ग्रामीण असा जोडला गेला आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे निवडणुकीत ग्रामीण भागालाही विशेष महत्त्व दिलं जातं. 2014 ची लोकसभा निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली होती. शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हे दोन दिग्गज उमेदवार रिंगणात होते. मात्र भाजप आणि शिवसेना युती असल्यामुळे मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभव झाला होता. तर शिवसेनेचे हेमंत गोडसे चार लाख 94 हजार 735 मतं घेऊन निवडून आले होते आणि नाशिक लोकसभेत शिवसेनेचा भगवा फडकला होता.

शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम अडल्याने राजकीय गणितं सध्या तरी स्पष्ट होत नाहीत. अशात युती तुटलीच तर भाजपकडून उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारबद्दल असलेली शेतकरी वर्गातली नाराजी, नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयांमुळे झालेली वाताहत यामुळे एकट्या भाजपला लोक निवडून देतील का हा प्रश्नच आहे. शिवाय स्वतः भाजपकडेही खासदारकीसाठी चेहरा नसल्याने वेळप्रसंगी भाजपला उमेदवार आयात करावा लागू शकतो.

यावेळचं संभाव्य चित्र कसं असेल?

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भुजबळ कुटुंबातील एक व्यक्ती लोकसभेचा उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय.   त्यामुळे या लोकसभेच्या रिंगणात स्वतः छगन भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ किंवा भुजबळांची सून असलेल्या शेफाली भुजबळ येऊ शकतात. समीर भुजबळांची चर्चा सध्या जोरात असल्याने पुन्हा पूर्वीसारखी लढत बघायला मिळू शकते. त्यामुळे अजूनच निवडणूक चुरशीची होऊ शकते. कारण, समीर भुजबळ यांनीही नाशिकच्या विकासाला चांगली गती देण्याचे काम केले होते.. त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. नाशिक-मुंबई रस्ता चौपदरीकरण, नाशिक-पुणे रस्ता चौपदरीकरण, नाशिक-त्रंबकेश्वर रस्ता चौपदरीकरण सुरु केलं होतं. नाशिकमधील महत्त्वाचा विषय एअरपोर्ट असेल. नाशिक बोटक्लब यांसह अनेक प्रकल्प समीर भुजबळ यांच्या काळात पूर्ण झाले आहेत. याशिवाय भुजबळांच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांचं जाळं उभं राहिलंय हेही सत्य नाकारता येणार नाही.

मित भाषी असलेले खासदार हेमंत गोडसे यांनीही शहरात विकासकामे काही प्रमाणात केली आहेत. जे काही मोठे प्रकल्प आहेत त्यांचाही त्यांनी पाठपुरावा केला. नाशिक-मुंबई लोकलसेवा सुरू व्हावी, तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची युनेस्कोमध्ये नोंद करावी, विमानसेवा, मुकणे धरणाचा पाणी प्रश्न असे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प शहरातील पूर्ण व्हावे म्हणजे नागरिकांच्या समस्या दूर होतील. दिल्लीला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस ही महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शहरांतून जावी यासाठी त्यांनी प्रयत्न त्यांनी प्रयत्न केलेत.

एकीकडे शिवसेना-भाजप यांच्यात वाद असताना आणि युतीचं चित्र अस्पष्ट असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मात्र जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार हे स्पष्ट असल्याने आता ही निवडणूक शिवसेना-भाजप विरुद्ध भुजबळ अशी होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामधील प्रमुख समस्या

शहरात अजूनही अनेक समस्या आहेत. सध्या नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्राला अवकळा आलेली आहे. अनेक मोठे प्रकल्प शहराबाहेर जात आहेत. महिंद्रा कंपनी, IT सेक्टर अजूनही शहरात प्रकल्प नाही. त्यामुळे तरुणांचा बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न उभा आहे. विमानसेवेचा खोळंबा झालेला आहे. नाशिक ते पुणे रेल्वे सेवा सुरू नाही. त्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक विकासकामे बाकी आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर कडवं आव्हान असेल ते राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचं. त्यामुळे नाशिककर आता कोणाच्या पारड्यात आपल्या मतांचा जोगवा टाकतात आणि कोणाच्या पाठीशी उभे राहतात, पुन्हा एकदा भुजबळ यांना संधी देतात का? हेमंत गोडसे यांना पुढील पाच वर्षे अजून काम करण्याची संधी देतात हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ

2014 मध्ये निवडून आलेले खासदार – हेमंत गोडसे

पक्ष -शिवसेना

प्रमुख विरोधक – समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) राजाराम पानव्हाणे (कांग्रेस), यांना नाशिक मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

लोकसभा 2014 मध्ये प्रथम मतांची आकडेवारी

हेमंत गोडसे -शिवसेना – 4 लाख 94 हजार 735

छगन भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस -3 लाख 7 हजार 399

डॉ. प्रदिप पवार – मनसे – 63 हजार 50

दिनकर पाटील – बहुजन समाज पार्टी – 20 हजार 896

तानाजी जायभाये – कम्युनिस्ट पार्टी – 17 हजार 150

नाशिक लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघ

देवळाली – योगेश घोलप (शिवसेना)

इगतपुरी – निर्मला गावित (काँग्रेस)

सिन्नर – राजाभाऊ वाजे (शिवसेना)

नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप)

नाशिक पूर्व – बाळासाहेब सानप ( भाजप)

नाशिक पश्चिम – सीमा हिरे ( भाजप)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI