विखे पाटलांसह महाराष्ट्रात काँग्रेसच्या 12 आमदारांचा पक्षापासून 'दुरावा'

Maharashtra congress MLA's, विखे पाटलांसह महाराष्ट्रात काँग्रेसच्या 12 आमदारांचा पक्षापासून ‘दुरावा’

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नवीन नेता निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडून काल मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटलांसह 12 आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे किमान 12 आमदार पक्षांतराच्या भूमिकेत आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नवा नेता निवडीसाठी विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे देखील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात अद्यापही सुरु आहे. विखेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकांमध्ये देखील काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती काँग्रेस करता चिंतेची बाब ठरू शकते असं बोललं जातंय.

गैरहजर आमदारांची नावं

राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे हे आमदार बैठकीकडे फिरकलेच नाहीत. तर काही आमदारांनी आजारी असल्याचं कारण सांगून बैठकीला येण्याचं टाळलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विदेशात असल्याने ते बैठकीला येऊ शकले नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे वारे हे भाजप आणि मोदींच्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे आणखी काही नेते पक्षांतर करणार का? याबाबत राजकीय कट्ट्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत आणि याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचं देखील बोललं जातंय.

विरोधी पक्ष नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वर्षा गायकवाड यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, आशिष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस विधीमंडळ पक्षासाठी नवा नेता निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला.

या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे विधीमंडळातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या नावाची घोषणा दिल्लीतूनच होईल हे स्पष्ट झालंय. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसला नेता निवडावा लागेल. त्यात विखे-पाटलांच्या राजीनाम्यामुळेच काँग्रेसवर नवा नेता निवडीची वेळ आली आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने ही तीन नावं राहुल गांधींना पाठवली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *