निम्मा महाराष्ट्र कोरडाच, राज्यात दुष्काळाचं सावट कायम

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरीही राज्यातील 150 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अजूनही सरासरी इतकाही पाऊस पडलेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

निम्मा महाराष्ट्र कोरडाच, राज्यात दुष्काळाचं सावट कायम

नागपूर : मुंबईसह उपनगरात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टी, नाशिकमध्ये सरीवर सरी कोसळत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. असे असले तरीही राज्यात अनेक भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरीही राज्यातील 150 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अजूनही सरासरी इतकाही पाऊस पडलेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यातील काही भागात दमदार पाऊस कोसळत असला, तरी काही ठिकाणी वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यासह इतर ठिकाणी दुष्काळचे सावट पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा उलटल्यानंतरही राज्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या जवळपास दीडशेहून अधिक आहे. पुरेसा पाऊस नसल्यानं या तालुक्यांमध्ये अवघा खरीप हंगामंच संकटात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस न पडल्याने बऱ्याच तालुक्यात यंदाही दुष्काळाची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यात सर्वाधिक मराठवाड्यातील तालुक्यांचा समावेश आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील 150 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अजूनही सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यातील 33 तालुक्यात सरासरीच्या अवघ्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला असून 37 तालुक्यात अवघा 25 ते 50 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे या तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील तब्बल 65 तालुक्यात सरासरीच्या अवघा 50 ते 75 टक्केच पाऊस झाला आहे. तर फक्त 59 तालुक्यात पडला सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदाही बऱ्याच तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान समाधानकारक बाब म्हणजे राज्यातील 159 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कृषी विभागाच्या या आकडेवारीनुसार, तब्बल 33 तालुक्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलाय. या भागात दुष्काळाचं संकट उभं राहिलं आहे.  कमी पाऊस पडलेल्या काही भागात दुबार पेरणी करावी लागलीय, तर समाधानकारक पावसाअभावी काही ठिकाणी पेरण्याच खोळंबल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *