कर्जमाफीची 40 टक्के रक्कमही अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही!

मुंबई : देशात सध्या निवडणुका आणि त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीचं वारं वाहत आहे. काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. काँग्रेसने प्रचारादरम्यानच शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनानुसार तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही अटींसह कर्जमाफी केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब या राज्यांनीही अगोदरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा …

कर्जमाफीची 40 टक्के रक्कमही अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही!

मुंबई : देशात सध्या निवडणुका आणि त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीचं वारं वाहत आहे. काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. काँग्रेसने प्रचारादरम्यानच शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनानुसार तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही अटींसह कर्जमाफी केली.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब या राज्यांनीही अगोदरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पण बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, या राज्यातल्या कर्जमाफीसाठी जेवढी रक्कम जाहीर करण्यात आली होती, त्याच्या 40 टक्के कर्ज माफ करण्यात आलंय. तर निम्म्यापेक्षाही कमी शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ झालाय.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 36 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली, ज्यामुळे 86 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार होता. एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज याअंतर्गत माफ केलं जाणार होतं. पण आतापर्यंत फक्त 24 हजार 700 कोटी म्हणजे 32 टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. पण या एकूण रकमेपैकी केवळ 17 हजार कोटींचाच म्हणजे निम्म्या रक्कमेचा लाभ आतापर्यंत शेतकऱ्यांना झाला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 10 हजार कोटींची कर्जमाफी केली. पण आतापर्यंत फक्त 3600 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलंय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार असलेल्या कर्नाटकात पहिल्या टप्प्यात 20 लाख शेतकऱ्यांसाठी 8200 कोटींची कर्जमाफी करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील 40 हजार कोटींची कर्जमाफीही अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.

कर्जमाफी केल्यानंतरही शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. कर्जमाफीचा लाभ न मिळण्यामागचं कारणही तसंच आहे. यासाठीचा भरावा लागणारा फॉर्म आणि जी जाचक कागदपत्र आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचत नाही. बँकेच्या गरजा, कागदपत्र आणि ऑनलाईन पद्धतीने यामुळे योजना असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्यात आलेला नाही. शिवाय अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीला पात्रही ठरलेले नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *